२०३ महिलांना ग्रामपंचायत सदस्यत्वाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:43 AM2020-12-15T04:43:50+5:302020-12-15T04:43:50+5:30
घनश्याम नवघडे नागभीड : तालुक्यात ४३ ग्रामपंचायतचीची निवडणूक होत असून यासाठी ३६३ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. ...
घनश्याम नवघडे
नागभीड : तालुक्यात ४३ ग्रामपंचायतचीची निवडणूक होत असून यासाठी ३६३ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यात २०३ महिलांना सदस्य म्हणून संधी मिळणार आहे.
नुकतेच प्रशासक नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामपंचायातींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला. यात नागभीड तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुका १५ जानेवारी २०२१ रोजी होत आहेत. नागभीड तालुक्यात या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तालुक्यात ६५ ग्रामपंचायती होत्या. यातील ९ ग्रामपंचायतींचा समावेश नागभीड नगर परिषदेत करण्यात आल्याने आता तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच पार पडल्या. त्यामुळे ४३ ग्रामंचायतींच्या निवडणुका होत आहेत.
वास्तविक यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ऑगष्ट महिन्यातच पार पडल्या असत्या. या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली होती. वार्ड निश्चितीपासून तर वार्डातील आरक्षणापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींनी पुन्हा गती घेतली आहे.
तालुक्यातील या ४३ ग्राम पंचायतसाठी ३६३ सदस्य निवडल्या जाणार आहेत. यात २०३ महिलांचा समावेश आहे. अनु.जातीसाठी सदस्यसंख्या ४४ असून महिलांसाठी १९ आरक्षित करण्यात आल्या आहे. अनु.जमातीसाठी एकूण जागा ७७ आहेत, यातील ४१ जागा महिलांसाठी आहेत. ना.मा.प्र प्रवर्गातील ९२ जागांपैकी ४७ महिलांसाठी सोडण्यात आल्या आहेत. तर सर्वसामान्य प्रवर्गातील १५० जागांपैकी ९६ जागा महिलांना मिळणार आहेत.
----------------