नागभीडमधील चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:30 AM2021-02-09T04:30:57+5:302021-02-09T04:30:57+5:30
नागभीड : चिमूर अप्पर जिल्हा कार्यालयास विरोध करणारा ठराव त्वरित पारित करून त्याचा पाठपुरावा करण्यात यावा, या मागणीसाठी नागभीड ...
नागभीड : चिमूर अप्पर जिल्हा कार्यालयास विरोध करणारा ठराव त्वरित पारित करून त्याचा पाठपुरावा करण्यात यावा, या मागणीसाठी नागभीड जिल्हा संघर्ष समितीने सोमवारी नगर परिषदेवर चढाई केली. यावेळी नागभीड जिल्हा झालाच पाहिजे, अशा घोषणाही देण्यात आल्या.
चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून एक नवीन जिल्हा निर्माण करावा, अशी फार जुनी मागणी आहे. ही मागणी प्रशासकीयदृष्ट्या योग्यसुद्धा आहे. कारण ब्रह्मपुरी नागभीडपासून मुख्यालय असलेल्या चंद्रपूरचे अंतर १२५ ते १०० कि.मी.च्या घरात आहे. त्यामुळे एखाद्या शासकीय कामासाठी गेलेला एखादा व्यक्ती त्याच दिवशी काम पूर्ण करून परत आला, असे कधी होत नाही. याच आर्थिक आणि मानसिक त्रासातून मुक्तता व्हावी म्हणून नवीन जिल्ह्याची मागणी अनेकदा होत असते. या हेतूनेच चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मितीचे शासनस्तरावर प्रयत्न आहे. शासनाने यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध करून आक्षेप मागविले आहेत. ही सूचना येताच नागभीड तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण झाल्यास त्यात समाविष्ट सर्वच तालुक्यांना अतिशय गैरसोयीचे होणार आहे. त्यापेक्षा चंद्रपूरच बरे, चंद्रपूरला जाण्यासाठी रेल्वेसारखा प्रवासाचा स्वस्त आणि दोन तासात पोहोचण्याचा पर्याय तरी उपलब्ध आहे, अशी मते नागरिक व्यक्त करीत आहेत. शासनाच्या या आदेशाला विरोध करण्यासाठी येथील व तालुक्यातील अनेक संघटना पुढे येत असून, या संघटनांनी आक्षेप नोंदविला आहे.
दरम्यान, सोमवारी नागभीड जिल्हा संघर्ष समितीने येथील नगर परिषदेला धडक देऊन चिमूर अप्पर जिल्हा कार्यालयास विरोध करणारा ठराव पारित करावा, अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्ष प्रा. डाॅ. उमाजी हिरे यांच्याकडे सादर केले.