काँग्रेससह विरोधी नगरसेवकांना महापालिकेत येण्यास मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:58 AM2021-09-02T04:58:59+5:302021-09-02T04:58:59+5:30
चंद्रपूर मनपाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह विरोधी नगरसेवकांमधील वाद उफाळू लागला आहे. गत आठवड्यात स्थायी ...
चंद्रपूर मनपाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह विरोधी नगरसेवकांमधील वाद उफाळू लागला आहे. गत आठवड्यात स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी यांच्यासह आठ सदस्यांचा कालावधी संपला. या जागेवर सभापतींसह अन्य सात सदस्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. भाजपचे मनपातील गटनेते वसंता देशमुख यांना सभापतीपदासाठी डावलल्यापासून पक्षातच धुमश्चक्री सुरू आहे. संभाव्य सभापतीचे नाव गटनेत्यांनाच पाठविण्याचा सर्वस्वी अधिकार आहे. मात्र, स्थायी समितीच्या सभापतीची निवडणूक होण्यापूर्वीच भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांनी देशमुख यांना गटनेते पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला. गटनेता निवडण्यासाठी भाजप व मित्र पक्षातील नगरसेवकांच्या स्टॅम्पवर स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या. परिणामी, विरोधकांऐवजी भाजपातील अतंर्गत वाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला. अशातच मंगळवारी ऑनलाईन आमसभेदरम्यान महापौर व आयुक्तांनी मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याने महापौर व आयुक्तांच्या मनमानी कारभाराचा अतिरेक झाल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे.
बॉक्स
मनपात नेमके काय घडले?
स्थायी समितीमधील निवृत्त सदस्यांच्या जागेवर नवीन नावे निश्चित करणे आणि अन्य विषयांसाठी मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन आमसभा आयोजित केल्याची नोटीस नगरसेवकांना देण्यात आली होती. कक्षातून सभेत ऑनलाईन सहभागी होण्यासाठी काँग्रेससह विरोधी गटाचे नगरसेवक मनपासमोर गेले असता प्रवेशद्वाराला कुलूप ठोकल्याचे दिसून आले. शिवाय, मनपासमोर पोलीसही तैनात होते.
बॉक्स
साडेसाती सद्धबुद्धी आंदोलनाद्वारे काँग्रेसचा निषेध
मनपा प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याचे पाहून काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांविरूद्ध जोरदार घोषणाबाजी करीत शर्ट काढून साडेसाती सद्धबुद्धी आंदोलन केले. महापौर व आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त लावून ऑनलाईन आमसभेसाठी आत येऊ दिले नाही, असा आरोप नगरसेवकांनी केला. मनपाचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणारे अनेक फलक लावल्याचेही आंदोलनस्थळी दिसून आले. आंदोलनात काँग्रेसचे गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, काँग्रेस कमिटीचे माजी शहर अध्यक्ष नंदू नागरकर, पप्पू देशमुख,
अ. भा. काँग्रेस कमिटी सदस्य सुनीता लोढीया, देवेंद्र बेले, अशोक नागापुरे, अमजद अली, नीलेश खोब्रागडे, संगीता भोयर, ललिता रेवलीवर, कलामती यादव, शालिनी भगत, हरिश कोत्तावार, अरविंद मडावी, स्वाती त्रिवेदी, सागर वानखेडे, अनिता चापले, निखिल धनवलकर, सौरभ ठाेंबरे, राजेंंद्र अवघडे, कुमार स्वामी पोचलवार, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बॉक्स
महापौर व आयुक्तांविरूद्ध पोलिसात तक्रार
प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याप्रकरणी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांच्याविरूद्ध शहर ठाण्यात तक्रार केली. चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी देशमुख यांनी ठाणेदार सुधाकर अंबोरे यांच्याकडे केली आहे.