बीएससी नर्सिंग प्रवेश प्रकियेतील जाचक नियमांचा विद्यार्थ्यांना फटका

By साईनाथ कुचनकार | Published: August 29, 2023 04:56 PM2023-08-29T16:56:03+5:302023-08-29T16:58:27+5:30

शेकडो विद्यार्थी वंचित राहणार : तोडगा काढणे गरजेचे

Oppressive rules in B.Sc Nursing admission process hit students | बीएससी नर्सिंग प्रवेश प्रकियेतील जाचक नियमांचा विद्यार्थ्यांना फटका

बीएससी नर्सिंग प्रवेश प्रकियेतील जाचक नियमांचा विद्यार्थ्यांना फटका

googlenewsNext

चंद्रपूर : या वर्षी पहिल्यांदाच राज्यात घेण्यात आलेल्या बीएससी नर्सिंग प्रवेश प्रकियेतील जाचक अटी व शर्थींचा फटका राज्यभरातील शेकडो विद्यार्थ्यांना बसणार आहे. पहिल्या फेरीत ज्यांना प्रवेश मिळाला आहे मात्र प्रवेश घ्यायचा नसला तरीही आधी प्रवेश निश्चित करूनच दुसरी व त्यानंतरची फेरीत उमेदवारांना नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी कॉलेज कुठेही असले तरी विद्यार्थ्यांना तिथे जाऊन शुल्क अदा करावे लागेल तरच पुढील फेरीसाठी पात्र करण्यात येणार आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचसीईटी) यांच्या वतीने यंदा प्रथमच बीएससी नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. प्रवेश प्रकियेतील निकालानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सादर केलेत व त्यानंतर पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नर्सिंग कॉलेज वाटप करण्यात आले. ही यादी प्रकाशित झाली व जे पात्र ठरलेत त्या विद्यार्थ्यांना २४ ते २९ ऑगस्टदरम्यान प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे व सोयीनुसार कॉलेज भेटले त्यांनी प्रवेश निश्चित केलेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार कॉलेज मिळाले नाहीत. त्यांनी दुसऱ्या फेरीत आपण प्रवेशासाठी प्रयत्न करू, असा निर्णय घेतला. मात्र आता हाच निर्णय विद्यार्थ्यांना अडचणींचा ठरू शकतो.

ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीचा पर्याय स्वीकारायचा आहे, त्यांना आधी जिथे प्रवेश मिळाला आहे त्या महाविद्यालयात जावे लागेल, तिथे प्रवेश निश्चित करावा लागेल, महाविद्यालयाचे शुल्क डिमांड ड्रॉफ्टच्या माध्यमातून अदा करावे लागेल व त्यानंतरच त्या विद्यार्थ्यांला दुसऱ्या फेरीसाठी पात्र समजले जाणार आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दूरवरचे कॉलेज मिळाले असेल त्यांना त्या ठिकाणी जाऊनच पुढील प्रक्रिया करावी लागत आहे.

अभियांत्रिकी किंवा अन्य शाखेमध्ये प्रवेश मिळूनही घ्यायचा नसेल तर बेटरमेंटचा पर्याय दिला जातो. मात्र नर्सिंग प्रवेशात कोणतेच पर्याय नसल्याने आता विद्यार्थ्यांना जागेवर जावे लागत आहे. सीईटी सेलने कोणताही पर्याय न ठेवल्याने विद्यार्थ्यांना पुढील फेरीपासून वंचित राहावे लागू शकते. आरोग्य विद्यापीठ व सीईटी विभागाने यावर तोडगा काढून विद्यार्थ्यांना ऑनलाइन संधी उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Oppressive rules in B.Sc Nursing admission process hit students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.