केशरी शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्य द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:30 AM2021-08-26T04:30:56+5:302021-08-26T04:30:56+5:30
चंद्रपूर : केशरी शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्य भेटत नसल्याचे त्यांची मोठी पंचायत होते. त्यामुळे केशरी शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्य देण्यात यावे, ...
चंद्रपूर : केशरी शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्य भेटत नसल्याचे त्यांची मोठी पंचायत होते. त्यामुळे केशरी शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्य देण्यात यावे, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
दारिद्र्य रेषेखालील व अल्प उत्पन्नधारकांना शासनाच्या वतीने रेशन दिल्या जाते. यासाठी वर्ग आखून देण्यात आले आहेत. उत्पन्नानुसार पांढरा, पिवळा आणि केशरी अशा शिधापत्रिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. यात पिवळा रंगाच्या शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्य शासकीय स्वस्त दराप्रमाणे मिळत आहे. मात्र केशरी कार्डधारकांना कुठल्याही प्रकारचे अन्नधान्य मिळत नाही. त्यामुळे गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर कामगार ज्याच्याकडे केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांची मोठी पंचायत होत आहे. कोरोनामुळे या कुटुंबाचे आर्थिक नियोजन बिघडले असल्याने नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्यशासनाने केशरी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्य द्यावे, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडने निवेदनातून केली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, सिद्धार्थ मेश्राम, रुपेश मुलकावार, नितेश बोरकुटे, शिवप्रसाद रहांगडाले, नरेश आत्राम, वसीम कुरेशी आदी उपस्थित होते.