सुभाषचंद्र बोस यांच्या फाईल्स नष्ट करण्यासाठी दिले होते आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:39 AM2019-01-25T11:39:36+5:302019-01-25T11:43:08+5:30
इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या ४०० फाईल्स नष्ट करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आझाद हिंद सेनेचे संस्थापक प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी येथे गुरुवारी पत्रकाराशी बोलताना केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या ४०० फाईल्स नष्ट करण्याचे आदेश दिले होते. इतकेच नव्हे, चार मंत्र्यांना त्यांच्या विभागाची कामे सोडून या फाईल्सचा अभ्यास करून त्यातील महत्त्वाची कागदपत्रे नष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप आझाद हिंद सेनेचे संस्थापक प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी येथे गुरुवारी पत्रकाराशी बोलताना केला. केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या विनंतीवरून एका कार्यक्रमासाठी चंद्रकुमार बोस चंद्रपुरात आले होते.
सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही. ज्या तारखेला नेताजींचा मृत्यू दाखविलेला आहे. त्या दिवसापूर्वी एक महिना आणि नंतरचा एक महिना या काळात कोणत्याही विमानाने घटनास्थळ दाखविलेल्या ठिकाणाहून उड्डाण घेतले नसल्याचे पुरावे आहेत. मात्र विद्यमान स्थितीत नेताजी जिवंत नसावे, कारण आजघडीला त्यांचे वय १२२ वर्षे आहे. इतकी वर्षे कुणीही जिवंत राहू शकत नाही, असेही ते म्हणाले. नेताजींच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टीगेटींग टीम (एसआयटी) गठित करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र यांच्याकडे केली आहे. एसआयटीच्या माध्यमातून जपान, सोव्हिएत रशिया व इंग्लंडमध्ये जावून चौकशी करावी लागेल. तेथे असलेल्या कागदपत्रांवरून सत्य पुढे येण्याची शक्यताही त्यांनी यावेळी वर्तविली. प्रतंप्रधान मोदी यांनी एसआटी गठित करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलल्याची माहितीही चंद्रकुमार बोस यांनी यावेळी दिली.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे अखंड भारताचे पहिले पंतप्रधान होते. २१ आॅक्टोबर १९४३ रोजी आझाद हिंद सरकारची स्थापना केली होती. या घटनेला आता ७५ वर्षे झाली आहे. मात्र त्यांना ७५ वर्षांत सन्मान मिळालेला नाही. ही इतिहास दाबून ठेवण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकार हा इतिहास बाहेर काढण्याचे काम करीत आहे. दिल्लीच्या लालकिल्ल्यावर तिरंगा फडकाविण्याची इच्छा नेजाती बाळगून होते. त्यानंतरच भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल, अशी त्यांची भावना होती. नेताजींची ही इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ आॅक्टोबर २०१८ रोजी लालकिल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकावून पूर्ण केली, याकडेही चंद्रकुमार बोस यांनी लक्ष वेधले.
नेताजींच्या आझाद हिंंद सेनेत ६० हजार सौनिक होते. पैकी २६ हजार सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले. हा इतिहासही गडप केला आहे. मात्र त्यांच्या सैन्यातील काही सैनिक आजही जिवंत आहे. येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर पथसंचलनात सहभागी करून त्यांना सन्मान दिला जाणार आहे. ७५ वर्षांनंतर मोदींच्या नेतृत्त्वातील सरकारकडून नेताजींना सन्मान मिळत असल्याचेही चंद्रकुमार बोस म्हणाले.