सिंदेवाहीत कृषी विद्यापीठ उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:23 PM2018-02-27T23:23:24+5:302018-02-27T23:23:24+5:30
पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ उभारावे, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
आॅनलाईन लोकमत
सिंदेवाही : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ उभारावे, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
अकोला येथील डॉ. पंजाबराव कृषी विद्यापिठाचे विभाजन करून पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसाठी नवीन कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शासनाने डॉ. वाय. एस. थोरात व डॉ. व्यंकटेश्वरलू समिती गठित केली होती. या समितीने सरकारला अहवाल सादर केला. सिंदेवाही येथे १९११ मध्ये ऊस व भात संशोधन केंद्र सुरू आहे. येथील केंद्राकडे २०० हेक्टर शेतजमीन उपलब्ध आहे.
पूर्व विदर्भ विभागाकरिता १९८४ पासून विभागीय कृषी संशोधन केंद्र सुरू असून सिंदेवाही, साकोली, नवेगाव, आमगाव व सोनापूर येथील कृषी संशोधन केंद्राचा समावेश आहे. २००४ पासून सिंदेवाही येथे कृषी विज्ञान केंद्र सरू झाले. कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्षेत्र चंद्रपूर जिल्हा निश्चित करण्यात आला आहे. नवीन कृषी विद्यापीठ स्थापन करण्याकरिता आवश्यक शेतजमीन, कार्यालयीन इमारत, निवासस्थान, शेतकरी भवन सभागृह, वसतिगृह आणि येथे गोदात उपलब्ध आहेत. नव्या इमारती बांधण्याची गरज नसल्याने शासनाचे ५०० कोटी रुपये बचत होवू शकतात. सिंदेवाही हे शहर बल्लारपूर ते गोंदिया रेल्वे मार्गाला जोडले आहे. तसेच चंद्रपूर-नागपूर चिमूर- गडचिरोली महामार्गाशी संबंधित आहे.
कृषी विद्यापीठाकरिता सर्वदृष्टीने अनुकूल स्थिती असल्याने राज्य शासनाने सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ उभारावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदन देताना सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पवार, हनुमंत बोरकर, मयूर सूचक, ऋषी मानकर, कैलास टहलियानी, किशोर मेश्राम, सतीश सहारकर, रमेश पित्तुलवार, हिरालाल इंदोरकर, श्रीधर बन्सोड, अशोक सागरे, जावेद खा पठाण, अरविंद देवतळे उपस्थित होते.