वन्यजीव सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
By admin | Published: September 27, 2016 12:52 AM2016-09-27T00:52:06+5:302016-09-27T00:52:06+5:30
चिमूर वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या शेडेगाव राऊंड व वनव्यवस्थापन समिती शेडेगाव यांच्या वतीने वन्यजिव सप्ताह ...
१ ते ७ आॅक्टोबर : चिमूर वन विभाग व वनव्यवस्थापन समिती शेडेगावचा उपक्रम
चिमूर : चिमूर वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या शेडेगाव राऊंड व वनव्यवस्थापन समिती शेडेगाव यांच्या वतीने वन्यजिव सप्ताह निमित्त १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमासह शालेय विद्यार्थ्यांसाठी व शालेय बाह्य विद्यार्थ्यांसाठी व गावातील नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
शासनाद्वारे व वनविभागाद्वारे राज्यात वन्यजिव सप्ताहचे आयोजन करण्यात येते. या वन्यजीव सप्ताह निमित्त मानवाला वन्यजीवाबाबत प्रेम, आपुलकी निर्माण व्हावी व पर्यावरणाचे महत्त्व नागरिकांना कळावे, या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जातात.
चिमूर वनपरिक्षेत्राचे अधिकारी बी.पी. चिवंडे व शेडेगाव राऊंडचे सहा वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.सी. धुर्वे यांच्या संकल्पनेतून या सप्ताहामध्ये शेडेगाव येथे गावकऱ्यांसाठी व जिल्हा परिषद तथा आठवले समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जंगल, वन्यप्राणी आणि पर्यावरणावर आधारित विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
वन्यजीव सप्ताहादरम्यान, वन्यजीवांचे पर्यावरणातील महत्त्व, पर्यावरणातील योगदान लक्षात घेता वनाचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
या दृष्टीने नागरिकात जाणीवजागृती करण्यासाठी वन विभाग, शेडेगाव व व्यवस्थापन समितीच्या वतीने १ आॅक्टोबरला निबंध स्पर्धा यामध्ये जल व मृदसंधारण आणि जलशिवार, मानवी जीवनातील पर्यावरणाचे महत्त्व, वन्यजीव संरक्षणाची आवश्यकता, संयुक्त वनव्यवस्थापन समिती आदी विषयांवर स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच ३ आॅक्टोबरला चित्रकला स्पर्धा, ४ तारखेला सामान्य ज्ञान स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)
विजेत्यांचा होणार गौरव
विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसासह प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. तर ५ आॅक्टोबरला वनावर आधारित प्रबोधनात्मक कलापथकाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ आॅक्टोबरला परिसरातील व सहभागी विद्यार्थी, नागरिकांना एक दिवसाची जंगल भ्रमंती व जनजागृती शिबिराचे आयोजन शेडेगाव कॅम्प जवळील कक्ष क्रमांक ३७१ मध्ये करण्यात आले आहे. तेव्हा वन्यजीव सप्ताहादरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन क्षेत्र सहायक व्ही. सी. धुर्वे व वन व्यवस्थापन समितीने केले आहे.