पाण्याची तजवीज करताना अंगाची लाहीलाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:22 PM2018-04-27T23:22:23+5:302018-04-27T23:22:44+5:30

यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा डिसेंबरमध्येच चिंताजनक स्थितीत पोहचला होता. शेतकऱ्यांसमोर खरीपातही सिंचना प्रश्न उभा ठाकला होता. त्यानंतर रबीमध्ये पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागली होती.

Organizing water | पाण्याची तजवीज करताना अंगाची लाहीलाही

पाण्याची तजवीज करताना अंगाची लाहीलाही

Next
ठळक मुद्देउन्हाची तीव्रता वाढतेयं : अनेक गावात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा डिसेंबरमध्येच चिंताजनक स्थितीत पोहचला होता. शेतकऱ्यांसमोर खरीपातही सिंचना प्रश्न उभा ठाकला होता. त्यानंतर रबीमध्ये पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागली होती. आता तर पाणी टंचाईने उग्र रुप धारण केले आहे. दुसरीकडे सूर्याचेही आग ओकणे सुरू आहे. अशा तप्त उन्हात पाण्याची तजवीज करताना ग्रामीणांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.
यावर्षी पावसाळ्यात वेळेवर पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे सर्व कामे आटोपून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत बसला. मात्र मृग नक्षत्रात पाऊस बरसलाच नाही. त्यानंतरही पावसाने उशिराच हजेरी लावली. उशिरा आलेल्या या पावसात शेतकऱ्यांनी बि-बियाणे पेरले. त्यानंतर पावसाची गरज होती. मात्र त्यावेळीही पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली. मध्यंतरीच्या काळात बऱ्यापैकी पाऊस पडला. मात्र तेवढ्या पावसाने जलसाठ्यात मुबलक पाणी साठू शकले नाही. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. अगदी परतीचा पाऊसही समाधानकारक पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हवा त्यावेळी पाऊस न पडल्याने पिकांवर रोगराईचे आक्रमण झाले. काही जणांची पिके सुकू लागली. शेतकºयांना खरिपात मोठा फटका सहन करावा लागला.
यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. डिसेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला आहे. नलेश्वर, चंदई, लभानसराड या प्रकल्पात जानेवारी महिन्यात पाहिजे तसा जलसाठा नव्हता. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पाण्याची पातळी खालावल्याने नदी, नाले, तलाव, बोड्या हे ग्रामीण भागातील जलस्रोत चिंताजनक स्थितीत आले. इरई धरणासह संपूर्ण सिंचन प्रकल्प आता एप्रिल महिन्यात ड्राय होण्याच्या मार्गावर आहे. एप्रिल महिना संपायला आला आहे. उन्हाची तिव्रताही वाढत आहे. पारा ४५ अंशापार गेला आहे. ग्रामीण भागातील जलस्रोट आटले आहे. नदी-नाल्यांसोबतच नागरिकांच्या घरातील विहिरी, बोअरवेल यांचेही पाणी कमी झाले आहे. एकूणच पाण्याची पातळीच खोल गेल्याने याचा सर्व जलस्रोतांवर परिणाम झाला आहे. जिवती, कोरपना तालुक्यातील परिसर पहाडी भाग आहे. या परिसरातील अनेक गावातील नागरिक आतापासूनच पाण्यासाठी भटकंती करीत आहे. आदिवासींचे गुडे पाण्याविना टाहो फोडत आहे. विशेष म्हणजे, या गुड्यातील नागरिकांना चक्क डबक्यातील पाणी पिऊन आपली व कुटुंबियांची तहान भागवावी लागत आहे. दरवर्षी हे विदारक चित्र समोर येते. मात्र संबंधित विभागाकडून यावर आजपर्यंत कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे आता येथील नागरिकही आहे त्या परिस्थितीतच वेळ निभावून नेत आहेत.
नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही या तालुक्यातीलही अनेक गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषद दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार करते. उपाययोजनाही कागदावर असतात. मात्र प्रत्यक्षात पाणी टंचाईची झळ सहन करणारी गावे त्यांच्या यादीतच नसतात. कागदावरील उपाययोजनाही बहुतांश प्रत्यक्षात अमलात येत नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी ओरड उन्हाळाभर सुरू राहते, असा आजवरचा अनुभव आहे. यावर्षीही जिल्हा परिषद तोच कित्ता गिरवत आहे.
हजारो हातपंप बंद
जिल्हा परिषदेकडून पाणी टंचाईचा आराखडा तयार करून उपाययोजनेसाठी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला जातो. त्याला मंजुरीही मिळते. मात्र परिस्थितीत काहीही फरक पडत नाही. उन्हाळाभर नागरिकांची भटकंती थांबत नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठा आधार असलेले हातपंप अखेरची घटका मोजत आहेत. जिल्ह्यातील असे हजारो हातपंप अनेक वर्षांपासून बंद आहेत. आराखड्याची अंमलबजावणी तर सोडा, साधे बंद असलेले हे हातपंप दुरुस्तीचे सौजन्य आजवर जिल्हा परिषदेने दाखविले नाही.

Web Title: Organizing water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.