योगाभ्यासासाठी मूलनगरी सज्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:04 AM2018-02-20T00:04:10+5:302018-02-20T00:04:27+5:30
योग ऋषी रामदेवबाबा यांच्याकडून मिळणाऱ्या योगाभ्यासासाठी मूल नगरी सज्ज झाली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे. येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर हजारो नागरिक योगाचे धडे घेणार आहेत.
आॅनलाईन लोकमत
मूल : योग ऋषी रामदेवबाबा यांच्याकडून मिळणाऱ्या योगाभ्यासासाठी मूल नगरी सज्ज झाली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे. येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर हजारो नागरिक योगाचे धडे घेणार आहेत. ‘न भुतो न भविष्यती’ या उक्तीप्रमाणे आगळावेगळा कार्यक्रम करण्याचा मानस पतंजली योग समितीने व्यक्त केला आहे. स्वामी रामदेवबाबा प्रथमच तीन दिवस मूल येथे मुक्कामी असून पालिकेचे स्वीकृत सदस्य अजय गोगुलवार यांच्या घरातील ‘संत निवासा’त ते राहणार आहेत, हे विशेष.
स्वामी रामदेव बाबा मूल नगरात येणार असल्याने दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाले आहे. मूल नगरीत सतत तीन दिवस नि:शुल्क योग चिकित्सा व ध्यान शिबिर होणार आहे. या ऐतिहासिक व अभूतपूर्व शिबिरात ५० हजार शिबिरार्थी उपस्थित राहणार असल्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. राज्याचे अर्थ, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हे योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तालुकास्तरावर असे शिबिर होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
२०, २१ व २२ फेब्रुवारी या तीनही दिवशी सकाळी ५ ते ७.३० वाजेपर्यंत स्वत: रामदेवबाबा योगाचे धडे देणार आहेत. त्यानंतर २० फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता होणाºया शेतकरी मेळाव्यात रामदेवबाबा मार्गदर्शनसुद्धा करणार आहेत. मूल नगरात प्रथमच योग शिबिर होत असून हरिद्वार येथून पतंजलीचे साधव, स्वाधी एक महिन्यापासून नियोजन करताना दिसत आहेत.
स्थानिक भाजपाचे व पतंजली समितीचे कार्यकर्ते शिबिरासाठी विशेष परिश्रम घेऊन अख्खा तालुका व जिल्हा पिंजून काढत आहे. प्रत्येक तालुक्यातून नागरिकांना या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
जिल्ह्यात आरोग्य ही चळवळ व्हावी- रामदेवबाबा
चंद्रपूर : मूल येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून योगचिकित्सा आणि ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून येत्या तीन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्यविषयक वातावरणाची निर्मिती होणार आहे. आरोग्य ही चळवळ व्हावी, हा आपला यामागील हेतू आहे, अशी माहिती योगगुरू रामदेवबाबा यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली. जगात १०० लाख कोटी रुपये केवळ आरोग्यावर खर्च केले जात आहे. तरीही रक्तदाब, मधुमेह, थायराईडसारख्या आजारावर कायम औषध नाही. औषध घेणारा आणि देणारा दोघेही कायम रहावे, हे यामागील षडयंत्र आहे. योगाने सात दिवसात ९९ टक्के लोकांचा रक्तदाब बरा होता. इतरही आजारांवर योगातून यशस्वी मात करता येते. दुसरीकडे जाती-धर्माच्या नावावर विष पसरवून समाजाचे तुकडे गेले जात आहे. प्रत्येकांनी सर्वजाती धर्माचा सन्मान राखावा. रोग आणि जातमुक्त भारत घडवायचा आहे, असेही रामदेवबाबा म्हणाले. राज्याचे अर्थ, नियोजन, वने मंत्री तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मूल येथे २० ते २२ फेब्रुवारीपर्यंत नि:शुल्क योगचिकित्सा व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त आज त्यांचे चंद्रपुरात आगमण झाले. याप्रसंगी रामदेवबाबा व ना. सुधीर मुनगंटीवार यांनी संयुक्तरित्या पत्रकारांशी वार्तालाप केला.
पालकमंत्रीही शिबिरार्थी
या तीन दिवशीय योग शिबिरात स्वत: रामदेवबाबा योगा शिकविणार आहेत. या शिबिरात एक शिबिरार्थी म्हणून राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे योगाचे धडे घेणार आहेत. या भव्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार असून स्क्रिनद्वारे नागरिकांना ते बघता येणार आहे.
तगडा पोलीस बंदोबस्त
शिबिरात ५० हजारांवर नागरिक उपस्थित राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे शिबिरादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रसासनाने तगडा बंदोबस्त ठेवला आहे. संपूर्ण मूल शहरात पोलिसांची तीन दिवस करडी नजर असणार आहे. कार्यक्रमस्थळी योग्य ती सुविधा, मंडप व इतर सुविधांची तयारी झाली आहे. याच ठिकाणाच्या बाजुला नि:शुल्क चिकित्सालय उभारण्यात आले असून त्याठिकाणी तपासणीसुद्धा केली जाणार आहेत. तसेच औषधी स्टॉलमधून औषधीसुध्दा घेता येणार आहे.
रुग्णालये शेवटचा पर्याय असावा - मुनगंटीवार
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यासाठी बल्लारपुरात लाईफलाईन ट्रेन आणली होती. विविध नेत्रचिकित्सा शिबिरे राबविली. ६०० कोटी रुपये खर्चंून चंद्रपुरात मेडिकल कॉलेज सुरू केले. शासनाचा ५० टक्के आणि टाटा ट्रस्टच्या ५० टक्के निधीतून जिल्ह्यात ९० कोटींचे कॅन्सर हॉस्पिटल होणार आहे. पण जनतेला दवाखान्यात जाण्याची गरज भासू नये, हा प्रयत्न आहे. योगा केल्याने आरोग्य सुदृढ ठेवता येते. जिल्ह्यात प्रत्येक नागरिकांनी आरोग्याला महत्त्व देत नियमित योगा करावा. दवाखाने हा शेवटचा पर्याय असावा, यासाठी हा प्रयत्न आहे, अशी माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. निती आरोगाच्या अध्यक्षाने ‘चांदा ते बांधा’ सारख्या योजनेची देशाला गरज आहे, अशा शब्दात या योजनेचे कौतुक केले. शेतकरी कौशल्य व बचत गटाच्या रोजगारासाठी सहकार्य मिळावे, अशी अपेक्षाही यावेळी ना. मुनगंटीवार यांनी रामदेवबाबा यांच्याकडे व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यात योगातून रोगमुक्ती करायची आहे. या शिबिराच्या माध्यमातून हजारो स्वयंसेवक तयार होतील. याचा फायदा जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यासाठी होईल, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
निवासातही चोख व्यवस्था
रामदेवबाबा अजय गोगुलवार यांच्या घरी तीन दिवस मुक्कामाने असल्याने या घरातही चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यांच्या जेवणासाठी खास आचारी राहणार आहे. सदर घराला‘संत निवास’ असे नाव देण्यात आले आहे. रामदेवबाबांच्या घरातील मुक्कामाने आपण सुखावून गेल्याचे अजय गोगुलवार यांनी सांगितले. सोमनाथ रस्त्यावर असलेल्या गोगुलवार यांचे घरात तीन दिवस चांगलीच वर्दळ असणार आहे.