१३ गावातील ३४५ महिला झाल्या स्वावलंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:49 PM2018-06-23T22:49:21+5:302018-06-23T22:50:16+5:30
काही वर्षांपूर्वी विकासापासून उपेक्षित असलेल्या पोंभूर्णा तालुक्यात आता मूलभूत विकासाला चालना देणाऱ्या अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी होत आहे.
निळकंठ नैताम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभूर्णा : काही वर्षांपूर्वी विकासापासून उपेक्षित असलेल्या पोंभूर्णा तालुक्यात आता मूलभूत विकासाला चालना देणाऱ्या अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे या परिसराच्या विकासाला मोठी कलाटणी मिळाली. खरे तर महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्याचा प्रकल्प या तालुक्यात नव्हताच. मात्र, राज्याचे अर्थ व नियोजन, वने मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीने सामूहिक कुक्कुटपालन व्यवसायाला सुरू झाली. त्यामुळे तब्बल १३ गावांतील ३४५ आदिवासी महिला नव्या दमाने आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करू लागल्या आहेत.
तालुक्यातील बहुतांश नागरिकांचा शेतीवरच उदरनिर्वाह आहे. कुटुंबाप्रमुखासोबत शेतीची कामे करण्याशिवाय महिलांना अन्य पर्याय नव्हता. प्रबळ इच्छाशक्ती असल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. पण दिशा मिळाली नव्हती. आंबे ेधानोरा, सातारा तुकूम, सातारा भोसले, आंबे तुकूम, उमरी पोतदार, घनोटी नं. २, थेरगाव, खरमत, चेक आष्टा, चेक नवेगाव, भटारी, केमारा व देवई येथील आदिवासी महिलांनी बचतगट स्थापन करूनही समूहशक्तीच्या जोरावर पारंपरिक व्यवसायाच्या पलिकडे त्यांना जाता आले नाही. दरम्यान, राज्य शासन, टाटा ट्रस्ट व नॅशनल स्मॉल होल्डर पोल्ट्री डेव्हलपमेंट (एनएसएचपीडीटी) च्या सहकार्याने तालुक्यातील बचत गटातील आदिवासी महिलांना कुक्कुटपालनाचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले गेले. कुक्कुटपालन म्हणजे काय, त्यातील व्यावसायिक दृष्टिकोन, बाजाराचे नवे तंत्र, लागणारे भांडवल कुठून मिळवायचे, प्रकल्पाची जागा कशी निवडायची व मार्केटींग आदी सर्वच पैलूंची अद्ययावत माहिती देवून महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यात आला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आम्हा आदिवासी महिलांची भेट घेवून संघटीत शक्तीचे कौतुक केले. यामुळे नवे बळ मिळाल्याने हे शक्य झाल्याचे या महिलांचे म्हणणे आहे.
-असा आहे प्रकल्प
महिलांनी पोंभूर्णा महिला पोल्ट्री प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. कुक्कुटपालन प्रकल्पासाठी आतापर्यंत १०० शेड बांधण्यात आले. उर्वरित २४५ शेडचे बांधकाम सध्या सुरू आहे. येत्या आॅगस्ट महिन्यात सर्वच शेड होतील, अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक असीत मोहन यांनी दिली. ६७ शेडमध्ये कोंबडीची पिल्ली ठेवली आहेत. ५५ शेडमधील कोंबड्यांची बाजारात विक्री झाली. यातून गुंतवणुकीच्या तुलनेत अधिक नफ ा झाला, या शब्दात महिलांनी आनंद व्यक्त केला. सदर प्रकल्पासाठी शासनाकडून ८० टक्के व टाटा ट्रस्टकडून २० टक्के अनुदान दिले जात आहे. एनएसएचपीडीटी ही संस्था कुक्कुटपालन प्रकल्पावर देखरेख करीत आहे.
तीन वर्षांत वाढविणार व्याप्ती
पोंभूर्णा तालुक्यातील ३४५ आदिवासी महिलांना कुकुटपालन व्यवसायातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. तीन वर्षांत पोंभूर्णासोबतच मूल व गोंडपिपरी तालुक्यातील ४० टक्के आदिवासी असलेल्या गावांतील १००० महिलांना या व्यवसायात सामावून घेतले जाणार आहे. व्यवसाय व रोजगारवृद्धी व्हावी, यासाठी सुमारे २०० मानसेवी म्हणून कर्मचाºयांची नियुक्ती केली जाईल. यातून परिसरातील महिलांना गावातच रोजगार मिळणार आहे. महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कुक्कुटपालनाचा व्यवसाय अतिशय परिणामकारक सिद्ध झाला आहे.
राज्यातील आदिवासी महिलांची एकमेव कंपनी
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून मूबलक निधी देण्याचे जाहीर आश्वासन एका कार्यक्रमात दिले होते. काही महिन्यांतच संबंधित विभागाला निर्देश देवून या प्रकल्पाला आर्थिक निधी उपलब्ध करून दिला. पोंभूर्णा महिला पोल्ट्री प्रोड्युसर या नावाने कंपनीची रितसर नोंदणी करण्यात आली. आदिवासी महिलांनी तयार केलेली ही राज्यातील एकमेव सामूहिक कंपनी आहे. आंबे धानोरा, सातारा तुकूम, सातारा भोसले, आंबे तुकूम, उमरी पोतदार, घनोटी नं. २, थेरगाव, खरमत, चेक आष्टा, चेक नवेगाव, भटारी, केमारा, देवई या गावांमध्ये ३४५ ठिकाणी कुकुटपालन शेड बांधकाम करण्यात आले. कुक्कुटपालन केल्यानंतर विक्रीसाठी एकत्र केले जाते. आदिवासी महिलांनी विक्रीचे तंत्रही अवगत केले आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कुक्कट पालनाचा व्यवसाय प्रगतीच्या दिशेने झेप घेत आहे.
माझे कुटुंब केवळ शेतीवरच अवलंबून आहे. शेतीमधून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे पूरक व्यवसाय करण्याची संधी मिळावी, यासाठी काही महिलांच्या सहकार्याने प्रयत्न करीत होते. बचतगटाद्वारे कुक्कुटपालन कंपनी सुरू करण्यासाठी सरकारने मार्गदर्शन व आर्थिक मदत केली. त्यामुळे उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. पुरविण्यात आलेले कोंबडीचे पिल्लू ३५ ते ४० दिवसांत वाढते. विक्रीची व्यवस्था झाल्याने आता माझे उत्पन्न वाढत आहे.
-कविता श्रीदास मडावी, सातारा तुकूम
शासनाकडून आम्हाला प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातून स्वयंरोजगार उभारण्याची पे्ररणा मिळाली. महिलांना संघटीत करून त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी शासनाने मदत केली. त्यामुळे आम्ही हा व्यवसाय सुरू केला. कुटुंबातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हा व्यवसाय उपयुक्त ठरला आहे. कुक्कुटपालनाचा व्यवसाय वाढविण्यासोबतच स्वत:चे उत्पन्नदेखील वाढेल, याबाबतीत मी आशावादी आहे.
-संगिता गणपत दुग्गा, केमारा
आदिवासी महिलांच्या प्रगतीसाठी शासनाने कंपनी उभारण्यास अनुदान दिले. एवढेच नव्हे तर कुक्कुटपालनाचा व्यवयास सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरविल्या. त्यामुळे आम्ही हा व्यवसाय सुरू करू शकलो. स्वत:चा आत्मविश्वास वाढला. पैशाची गरज आता आम्ही स्वत:च पूर्ण करीत आहोत. यातून कुटुंबाला आधार मिळाला.
- वैशाली अनंता कोडापे, खरमत