१८१ पैकी ६९ शेतकऱ्यांनी योजनेतील दुधाळ जनावरे नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:30 AM2021-08-22T04:30:26+5:302021-08-22T04:30:26+5:30
राजू गेडाम मूल : शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मूल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दोन दुधाळ ...
राजू गेडाम
मूल : शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मूल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दोन दुधाळ जनावरे अनुदानावर देण्याची योजना मंजूर करण्यात आली. या योजनेसाठी १८१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मात्र फक्त ११२ शेतकऱ्यांनी दुधाळू जनावरे घेतली. उर्वरित ६९ शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने ६२ लाख १० हजार रुपये शासनाकडे परतीच्या मार्गावर आहे. आर्थिक उत्पन मिळवून देऊ पाहणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा कमी पडल्याचे दिसत आहे.
शेती व्यवसायाला जोड मिळावी, जेणेकरून शेतकरी आर्थिक संपन्न होईल, या उद्देशाने बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल, बल्लारपूर व पोभूर्णा या तीन तालुक्यासाठी चांदा ते बांदा या विशेष योजनेच्या माध्यमातून पशुसंवर्धंन विभागाअंतर्गत सन २०१९-२० या वर्षात दोन दुधाळ जनावरे अनुदानावर देण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात आले. अनुसूचित जाती व जमातीसाठी १० टक्के व इतर मागासवर्गीयांसाठी २५ टक्के अनुदानावर ही योजना असून दोन दुधाळ जनावरे एक लाख २० हजार रुपये किंमत शासनाने ठरवून दिली होती. यात अनु.जाती जमाती ५१ व सर्वसाधारणसाठी १३० शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यात अनु. जाती जमातीच्या सर्वच शेतकऱ्यांनी लाभ घेतला. मात्र सर्वसाधारणमधील फक्त ६१ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. उर्वरित ६९ शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून लाभ घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे यासाठी आलेला ६२ लाख १० हजार रुपयांचा निधी शासनाकडे परत जाणार आहे.
कोट
चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून सन २०१९-२० या वर्षात दुधाळ जनावराचा लाभ घेण्यासाठी रितसर प्रस्ताव मागविण्यात आले. आलेल्या प्रस्तावातून अनु. जाती जमातीसाठी ५१ तर इतर मागाससाठी १३० प्रस्ताव मंजूर करण्यात आले. फक्त ६१ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. उर्वरित ६९ शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. यासाठी प्रयत्न केला जात आहे.
- आर.जे. वेटे, पशुधन पर्यवेक्षक, पशुसवर्धन विभाग पं.स. मूल