३३९ प्रस्तावांपैकी केवळ निम्मे प्रस्तावच मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:00 AM2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:00:26+5:30
शेतीची कामे करताना विविध प्रकारचे अपघात व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो. अशा मय्यत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. या योजनेतंर्गत सन २०१६-२०२० या चार वर्षात जिल्हाभरातून एकूण ३३९ प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले. यापैकी १४३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विविध त्रुटींमुळे ५९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.
परिमल डोहणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतीची कामे करताना शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सुरु केलेले गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे. मागील चार वर्षात या योजनेसाठी ३३९ प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र त्यापैकी केवळ १४३ प्रस्तावांना मंजूरी मिळाली आहे. तर ५९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहे.
शेतीची कामे करताना विविध प्रकारचे अपघात व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो. अशा मय्यत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. या योजनेतंर्गत सन २०१६-२०२० या चार वर्षात जिल्हाभरातून एकूण ३३९ प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले. यापैकी १४३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विविध त्रुटींमुळे ५९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. सद्य: स्थितीत चार वर्षाचे मिळून त्रुटी पुर्ततेकरिता ७३ प्रस्ताव प्रलंबित असून ६४ प्रस्ताव प्रक्रियेमध्ये आहेत.
शेतात काम करताना अपघात झाल्यास अथवा नैसर्गिक आपत्तीने जखमी किंवा मृत्यू झाल्यास संबंधितांना नुकसानभरपाई म्हणून आर्थिक लाभ दिला जातो. या लाभासाठी शेतकरी किंवा वारसदाराने विम्याच्या कालावधीत तलाठ्यांच्या प्रमाणपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या प्रस्तावाची नोंद घेऊ न शासनाने विमा सल्लागार असलेल्या विभागीय कार्यालयाकडे हे प्रस्ताव पाठवतात.
विमा सल्लागार कार्यालयाकडून प्राथमिक छाननी करुन प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केले जातात. पात्र प्रस्तावाला विमा कंपनीकडून मंजुरी देऊन संबंधितांना आर्थिक लाभ मिळतो. मात्र जाचक अटींमुळे अनेकजण वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.
अशी मिळते मदत
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास दोन लाख रूपये नुकसान भरपाई मिळते. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकाली झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकाली झाल्यास दोन लाख रूपये तसेच अपघातामुळे जखमी झाल्यास सबंधित शेतकºयाला एक लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाते.
यांना मिळतो योजनेचा लाभ
पाण्यात बुडून मृत्यू होणे, जंतुनाशके हातळताना किंवा इतर कारणाने झालेली विषबाधा विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू होणे, हत्या, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचू दंश, रस्ता, रेल्वे अपघात, जनावरांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत्यू आदी प्रकारच्या बाबींसाठी मृतक शेतकऱ्यांचे वारसदार तसेच जखमी शेतकऱ्यांला विमा दिला जातो.
योजनेसाठी आवश्यक कागपदत्र
गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्तावासोबत सादर करणे गरजेचे आहे. लाभार्थी शेतकऱ्याच्या नावाचा समावेश असलेला सातबारा किंवा आठ अ नमून्यातील उतारा, ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव सातबारावर आले असेल, अशी संबंधित फेरफार नोंद, शेतकऱ्यांचे वारसदार म्हणून तलाठ्याकडील गाव नमूना क्र. ६ ची नोंद, अपघाताच्या स्वरूपानुसार विहीत केलेली दस्तावेज सादर करणे गरजेचे आहे.