८४७ पैकी ५३६ ग्रामपंचायतींचा कारभार जुन्याच पद्धतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:43 AM2020-12-12T04:43:30+5:302020-12-12T04:43:30+5:30
गोंडपिपरी : राज्य शासनाने आपले सरकार योजनेत ई-ग्रामसॉफ्ट ही संगणक प्रणाली तयार केली आहे. आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत ...
गोंडपिपरी : राज्य शासनाने आपले सरकार योजनेत ई-ग्रामसॉफ्ट ही संगणक प्रणाली तयार केली आहे. आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत जिल्ह्यातील८४७ ग्रामपंचायतींपैकी ३११ ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या आहेत. मात्र, उर्वरीत ५३६ ग्रामपंचायतींचा कारभार अजुनही जुन्याच पद्धतीने सुरू आहे.
ग्रामीण भागात उदभवणा-या परिस्थितीवर मात करीत जिल्ह्यातील ३११ ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या आहेत. या ग्रामपंचायतीची सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. योजनेतील ई-ग्रामसॉफ्ट नावाची संगणक प्रणाली बनवली आहे. त्यामुळे संबंधित ग्रामस्थांना ३३ प्रकारचे दाखले ग्रामपंचायतीमधून ऑनलाईन प्राप्त होत आहेत. आर्थिक व्यवहारासह विविध नोंदी संगणकावर सुरु झाल्या आहेत. यासाठी ग्रामपंचायतीचे १ ते ३३ प्रकारचे नमुने संगणकाद्वारे देण्यासाठी ग्रामविकास विभागाने आपले सरकारच्या सेवा केंद्रातील ई-ग्रामसॉफ्ट विकसित केले आहे.
ग्राम विकास विभागाच्या आदेशानुसार १ एप्रिलपासून आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे. आपले सेवा सरकार केंद्र प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट ग्रामपंचायतस्तरावरून आयटी संसाधनाच्या सहाय्याने सर्व ग्रामपंचायत संगणकीकृत करणे, यासोबतच नागरिकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रात सेवा देणे, कामकाजात पारदर्शकता आणली जाणार आहे.वार्षिक कर मागणी, वसुलीसाठी कामाचे देयक, ग्रामपंचायत लेखा परीक्षण पूर्तता वही मालमत्ता, कामाचे देयक, कामाचे अंदाजपत्रक नोंदवही, वार्षिक कर पावतीचे कामे इत्यादी ई-ग्रामसॉफ्टमध्ये झाली आहे.
बॉक्स
प्रमाणपत्रांचा समस्या संपुष्ठात
मालमत्ता कर, रहिवासी, वीज जोडणीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र, शौचालय दाखला, विवाह नोंदणी दाखला, हयातीचा दाखला, वयाचा दाखला व असे विविध दाखले ऑनलाईन दिले जात आहेत. आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या हस्तलेखी नोंदी बंद करण्यात आल्या.
कोट
केंद्र शासनाच्या ई-ग्राम अभियानअंतर्गत ग्रामपंचायतीचे कामकाज राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून हे काम हाती घेतले आहे. पारदर्शक सेवेसाठी पेपरलेस प्रणाली अत्यंत योग्य आहे. यामुळे कामे वेळेवर होत आहेत. ही संकल्पना संपूर्ण ग्रा.पं.ने राबवावी.
-खुशाल हरडे, प्रकल्प व्यवस्थापक, आपले सरकार सेवा केंद्र, चंद्रपूर