विद्युत व्यवस्थापकाची नियमबाह्य निवड
By admin | Published: April 14, 2017 12:53 AM2017-04-14T00:53:10+5:302017-04-14T00:53:10+5:30
ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबविण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने विद्युत
वाघेडा येथील प्रकार : ग्रामपंचायत सदस्यांचा मनमानी कारभार
चिमूर : ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबविण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने विद्युत व्यवस्थापकाची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण राज्यभर सुरू केली आहे. त्या अंतर्गत चिमूर तालुक्यातील वाघेडा गटग्रामपंचायतीच्या आमसभेत शासन निर्णयाची पायमल्ली करीत वायरमन आयटीआयमध्ये जास्त गुण असलेल्या उमेदवाराला डावलून कमी गुण असणाऱ्या उमेदवाराला राजकीय आकसापोटी जवळच्या नातेवाईकांची निवड केल्याचा आरोप अन्यायग्रस्त मंगेश केशव मगरे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे.
ग्रामीण भागातील नागरिक नेहमीच विजेच्या लपंडावाने त्रस्त असतात. लाईनमन ग्रामीण भागात वेळेवर सेवा देऊ शकत नाही. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागात विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. मात्र चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाघेडा येथे विद्युत व्यवस्थापकाच्या निवडीमध्ये गैरप्रकार करून शासन आदेशाला डावलण्यात आले आहे. विद्युत व्यवस्थापकाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. त्यानुसार विक्की भाऊराव पाऊलगुडे, मंगेश केशव मगरे या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विद्युत व्यवस्थापकाच्या निवडीसाठी ३० मार्चला वाघेडा येथे मासिक सभा घेण्यात आली. यात विक्की भाऊराव पाऊलगुडे यांना इलेक्ट्रिशियन आयटीआयमध्ये फक्त ६५ टक्के गुण मिळाले. तर मंगेश मगरे यांना ६९.४४ टक्के गुण मिळाले. शासन आदेशानुसार मंगेश मगरे हे पात्र उमेदवार होते. परंतु त्यांना डावलण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)