३३ हजार झाडांपैकी पाच वर्षांत मोजकीच झाडे जगली !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 05:26 PM2024-05-06T17:26:21+5:302024-05-06T17:27:19+5:30
वनकर्मचारी उदासीन : शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. हे हेरून वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेत मूल शहरानजीक कक्ष क्रमांक ७५२ मध्ये सन २०१९ ला ३० हेक्टर जागेत ३३ हजार झाडे लावण्यात आली. पाच वर्षांत झाडांची वाढ होणे गरजेचे असताना त्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने लावलेली झाडे फारशी वाढू शकली नाही. त्यामुळे मोजकीच झाडे जगली आहेत.
त्यात गवत व अनावश्यक झाडे भरमार उगवली असल्याने लागवडीचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम फेल ठरल्याने शासनाचा लाखो रुपयांचा चुराडा झाल्याचे दिसून येते. वृक्षांचे संवर्धन झाले तर वन्यप्राण्यांचा अधिवास सुरक्षित होते. यासाठी वन विभाग वृक्ष संवर्धन करण्यासाठी दरवर्षी लाखो वृक्षांचे वृक्षारोपण केले जाते. ज्या जोशात वृक्षारोपण केले जाते, त्याच तत्परतेने कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देऊन लावलेल्या सगळ्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी बाध्य करणे आवश्यक आहे. मात्र, असला प्रकार होत नसल्याने वृक्ष संवर्धन होत नसल्याची ओरड सुरू आहे.
तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांनी पुढाकार घेत मूल शहरानजीक असलेल्या कक्ष क्रमांक ७५२ मध्ये सन २०१९ ला ३० हेक्टर जागेत ३३ हजार झाडांचे वृक्षारोपण केले. यावेळी प्रत्येक वर्षी वृक्ष संवर्धनावर वेळोवळी लाखो रूपये खर्च करण्यात आले. मात्र, वृक्ष संवर्धन होऊ शकले नाही. वृक्ष देखभाल करण्याचा कालावधी पाच वर्षांचा झाला असताना शेवटच्या वर्षात वृक्ष कमी व गवत जास्त अशी स्थिती दिसत आहे. ३३ हजार झाडांपैकी बोटावर मोजण्याइतकी झाडे शिल्लक असल्याचे दिसून येते.
झाडांच्या सभोवताल अनावश्यक गवत वाढले
जिवंत झाडाच्या सभोवताल कचरा वाढलेला आहे. मात्र, वन कर्मचारी झाडासमोरील कचरा काढण्याचे साधे सौजन्य दाखवीत नसल्याने वृक्ष लागवडीपेक्षा त्यावरील खर्च दाखवून त्यातील मलिदा खाण्यातच धन्यता मानताना दिसत आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडीचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम फेल ठरत असल्याचे यावरून दिसून येते.
वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी कर्मचारी तत्पर असून सन २०१९ ला सर्व्हे नं. ७५२ मध्ये ३० हेक्टर जागेत ३३ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. आजच्या घडीला २० हजारांपर्यंत झाडे सुस्थितीत आहेत. वन कर्मचारी टीम वर्कच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाकडे विशेष लक्ष देत आहेत.
- एम.जे. मस्के, क्षेत्र सहायक मूल