नाला बुजवून ले-आऊटधारकांनी केला नियमबाह्य रस्ता
By admin | Published: July 12, 2014 11:34 PM2014-07-12T23:34:36+5:302014-07-12T23:34:36+5:30
राजुरा शहरात अनेक कामे नियमबाह्य असून शासकीय अधिकारी कुठेच कारवाई करताना दिसत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. शहरातील भारत चौक परिसरातील नाला बुजवून ले-आऊटकडे जाण्यासाठी
राजुरा : राजुरा शहरात अनेक कामे नियमबाह्य असून शासकीय अधिकारी कुठेच कारवाई करताना दिसत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. शहरातील भारत चौक परिसरातील नाला बुजवून ले-आऊटकडे जाण्यासाठी रस्ता तयार केला. कुठलीही परवानगी नाही. ही दबंगशाही राजुरा शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असून आता चक्क नाला बुजविला जातो. तहसील कार्यालयाचे अधिकारी मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.
एखादा गरीब जमिनीवर घर बांधतो. त्याला नोटीस बजावली जाते. दुसरीकडे नाला बुजविला जातो. परंतु शासकीय यंत्रणेला माहीत होत नाही. याचा अर्थ शासकीय अधिकारी कुठेतरी मॅनेज झाल्याचे दिसून येते. या प्रमाणेच सर्वे क्रमांक १४९ मध्ये तर हिंदु समाज आणि मुस्लीम समाजाच्या स्मशानभूमीतून रस्ता तयार केला. एवढयावरच थांबले नाही तर ले-आऊटधारकांनी नाल्यावरच पूल बांधून टाकला. बिना परवानगीने असा प्रकार सुरू आहे. कुणी शासकीय जमिनी हडपत आहे, कुणी शासकीय जमिनीवर पूल बांधत आहे, कुणी वाहता नाला थांबवून तो माती टाकून बुजवून टाकून ले-आऊटकडे जाण्याचा रस्ता तयार करीत आहे. ही बाब गंभीर असताना याकडे लक्ष पुरविण्यासाठी कुणीही धजत नाही. शासकीय जमिनीवर ले-आऊटधारक सर्रासपणे आपल्या सोईसाठी काहीही करीत असून येथील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी मात्र चुप बसले आहे. राजुरा शहरातील सर्वे क्र. १४९ मध्ये शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून या जमिनीवर तहसिलदारापासून तर अनेक शासकीय-निमशासकीय अधिकाऱ्यांचेच अतिक्रमण आहे. याठिकाणी रस्ते झाले, विद्युत आली, हा गोरखधंदा मागील दहा वर्षापासून राजरोसपणे सुरू आहे. परंतु येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुठलीच दखल घेतली जात नाही. स्मशानभूमीतून रस्ता झाल्यामुळे याठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. राजुरा शहरात भारत चौकातील नाला बुजविल्यामुळे आणि ले-आऊटधारकांनी मातीचे ढिगारे टाकल्यामुळे भारत चौक परिसरात पावसाळ्यात बँक वॉटरमुळे अनेक घरे पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. चक्क नाल्याला लागूनच काही ले-आऊट तयार होत आहे. (शहर प्रतिनिधी)