डेंग्यूचा प्रकोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 06:00 AM2019-11-05T06:00:00+5:302019-11-05T06:00:34+5:30
चंद्रपूर जिल्ह्याला अस्मानी संकटांनी त्रासून सोडले आहे. जिल्ह्यात जवळजवळ सर्वच शेतकरी अवेळी झालेल्या पावसामुळे वैतागले आहे. संपूर्ण पिके डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले आहे. अशातच आता साथीच्या आजारानेही जिल्हावासीयांना नाकीनऊ आणले आहे. मागील दीड महिन्यांपासून व्हायरल फिवरने हजारो नागरिक खाटेवर खिळून होते. त्यानंतर आता डेंग्यूने तापाने नागरिकांची झोप उडविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सध्या ओला दुष्काळ आणि तापाच्या विळख्यात सापडला आहे. व्हायरल फिवर, टाईफाईड, डायरियाने जिल्ह्यात थैमान घातले असतानाच आता डेग्यूनेही जिल्ह्याला आपल्या कवेत घेतल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसते. मागील महिनाभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल २३७ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. केवळ शासकीय रुग्णालयाचे हे आकडे आहेत. चंद्रपुरातील अनेक खासगी रुग्णालयातही सध्या डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण भरती असल्याची माहिती आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला अस्मानी संकटांनी त्रासून सोडले आहे. जिल्ह्यात जवळजवळ सर्वच शेतकरी अवेळी झालेल्या पावसामुळे वैतागले आहे. संपूर्ण पिके डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले आहे. अशातच आता साथीच्या आजारानेही जिल्हावासीयांना नाकीनऊ आणले आहे. मागील दीड महिन्यांपासून व्हायरल फिवरने हजारो नागरिक खाटेवर खिळून होते. त्यानंतर आता डेंग्यूने तापाने नागरिकांची झोप उडविली आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील महिनाभरात तब्बल २३७ डेंग्यूचे रुग्ण दाखल झाले. डेंग्यूच्या रुग्णांची ही धक्कादायक आकडेवारी केवळ एकट्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहे. चंद्रपुरातील अनेक खासगी रुग्णालयातही सध्या शेकडो डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. अनेक गंभीर डेंग्यू रुग्णांना नागपूरलाही रेफर केल्याची माहिती खासगी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर लोकमतशी बोलताना दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण जिल्ह्यात असताना आरोग्य यंत्रणा अद्याप गंभीर झाल्याचे दिसत नाही. जिल्ह्यात सुरू असलेला डेग्यूचा हा प्रकोप आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.
महिनाभरात ७२३ व्हायरल फिवरच्या रुग्णांची नोंद
मागील दीड महिन्यांपासून जिल्ह्यात व्हायरल फिवरने चांगलेच थैमान घातले होते. वातावरणातील वारंवार होत असलेल्या बदलामुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात महिनाभरात ७२३ व्हायरल फिवरच्या रुग्णांची नोंद झाली. खासगी दवाखान्यात तर याहून चौपट व्हायरल फिवरच्या रुग्णांनी मागील महिनाभरात उपचार करवून घेतला. यासोबतच जिल्ह्यातील काही भागात डायरियाने अनेकजण बाधित झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सामान्य रुग्णालयात २७३ डायरियाचा रुग्ण दाखल करण्यात आले होते.
डेंग्यूची अशी असतात लक्षणे
डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. उदा. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळयांच्यामागे दुखणे. रक्तस्त्रावित डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची गंभीर अवस्था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते व त्याच्यासोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात. सुरुवातीच्या काही दिवसात याची लक्षणे साध्या डेंग्यू तापासारखी असतात व क्वचित त्वचेवर पुरळ दिसून येतात. रक्तस्त्रावित डेंग्यू तापाचे निदान अंगावरील दर्शनिय भागावर (हातपाय, चेहरा व मान) यावर आलेल्या पुरळांवरुन केली जाते. नाकातून, हिरडयातून व गुदद्वारातून रक्तस्त्राव अशीही लक्षणे आढळतात.