उन्हाळी धानावरील खोडकिडीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:34 AM2021-02-17T04:34:32+5:302021-02-17T04:34:32+5:30
चंद्रपूर : कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही यांनी जिल्ह्यातील उन्हाळी धानाचे सर्वेक्षण केले. यामध्ये धान पीक हे रोवणी ...
चंद्रपूर : कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही यांनी जिल्ह्यातील उन्हाळी धानाचे सर्वेक्षण केले. यामध्ये धान पीक हे रोवणी केलेल्या अवस्थेत असून खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या वर्षी उन्हाळी हंगामामधे सतत ढगाळ वातावरण, रात्रीस अधिक आर्द्रता यांमुळे उन्हाळी धान पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास येणाऱ्या काळात हा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्या, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
खोडकिडीचा पतंग १ ते २ सें.मी. लांब, समोरील पंख पिवळे, मागील पांढरे तर समोरील पिवळ्या पंखांवर प्रत्येकी एक ठळक काळा ठिपका असतो. अंडी पुंजक्याच्या स्वरूपात असून पिवळसर तांबड्या तंतुमय धाग्यांनी पानाच्या शेंड्यावर झाकलेले असतात. पूर्ण वाढ झालेली अळी २० मि.मी. लांब पिवळसर व पांढरी असते. खोडकिडीची अळी खोड पोखरते; त्यामुळे रोपाचा गाभा मरतो व फुटवा सुकतो. यालाच कीडग्रस्त फुटवा / गाभेमर / डेडहार्ट म्हणतात. हा फुटवा ओढल्यास सहज निघून येतो. अशा फुटव्यास दाणे न भरलेल्या पांढऱ्या ओंब्या येतात. शेतकऱ्यांनी धान पिकाची वेळीच पाहणी करून पीक संरक्षणाचे उपाय करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.