साथीच्या आजारांचे खापर वटवाघुळांवर फोडणे धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 05:00 AM2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:01:12+5:30
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर भारतात, महाराष्ट्रात व जगभरात वटवाघूळ अभ्यासक्षेत्रात नेमके काय चालले आहे, यासंदर्भात माहिती देताना अनिरूद्ध चावजी म्हणाले, वटवाघूळांच्या जगात १११, भारतात १२९ आणि महाराष्ट्रात सुमारे ५० जाती आहेत. प्राणीशास्त्रानुसार वटवाघूळांचे मायक्रोबॅट व मेगाबॅट या दोन प्रकारात वर्गीकरण केल्या जाते. त्यामध्ये कीटकभक्ष्यी व फळभक्ष्यी या प्रकारांना अतिशय महत्त्व आहे.
राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतीय आणि जगाच्या पाठीवरील काही देशांमध्ये वटवाघूळ हा निरूपद्री, दिसायला अत्यंत कुरूप, झाडाला उलटा लटकणारा व रात्री संचार करणारा निशाचर म्हणून अशास्त्रीय व विविध धर्मप्रेरित मिथकांचा सातत्याने बळी ठरत आला आहे. वटवाघूळ स्वत:हून कुणाच्या वाट्याला जात नाही. निसर्गातील त्याची उपयुक्तता सर्वविदीत आहे. बहुतांश प्राणी-पक्ष्यांमध्ये विषाणू असतात, वटवाघूळातही आहेत. निपाह व्हायरसपासून तर कोरोना व्हायरससाठी वटवाघूळेच जबाबदार असल्याचे अद्याप सिद्ध झाले नाही. मात्र, निसर्गातील मानवी हस्तक्षेप दुर्लक्षित करून साथीच्या आजारांचे खापर केवळ वटवाघूळांवरच फोडणे सुरू राहिल्यास जगभरातील वटवाघूळांच्या वसाहती उद्ध्वस्त होतील, असा दावा ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव व वटवाघूळ अभ्यासक अनिरूद्ध चावजी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर भारतात, महाराष्ट्रात व जगभरात वटवाघूळ अभ्यासक्षेत्रात नेमके काय चालले आहे, यासंदर्भात माहिती देताना अनिरूद्ध चावजी म्हणाले, वटवाघूळांच्या जगात १११, भारतात १२९ आणि महाराष्ट्रात सुमारे ५० जाती आहेत. प्राणीशास्त्रानुसार वटवाघूळांचे मायक्रोबॅट व मेगाबॅट या दोन प्रकारात वर्गीकरण केल्या जाते. त्यामध्ये कीटकभक्ष्यी व फळभक्ष्यी या प्रकारांना अतिशय महत्त्व आहे. वटवाघूळांच्या पंखांना बोटं व उपांग असतात. वटवाघूळांवर विषाणूंचा फारसा अनिष्ट परिणाम होत नसल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासातून आढळून आले आहे. ते स्वत: आजारी न पडता कित्येक प्रकारच्या विषाणूंना आश्रय देऊ शकतात. कोरोनासारख्या विषाणूंचे यजमानही तेच असल्याचा केवळ संशय घेतला जात आहे. पण अद्याप सिद्ध झाले नाही, असेही ते म्हणाले.
चुका मानवाच्या, आरोपीच्या पिंजऱ्यात ‘वटवाघूळ’
२०१९ मध्ये सार्स कोविड-२ या आजाराची साथ आली होती. तिचा संबंध चीनच्या वुहानमधील माणसांना खाण्यासाठी मांडलेल्या जिवंत प्राण्यांच्या ‘वेट मार्केट’ शी असल्याचे मानले जाते. मात्र, नंतर झालेल्या अभ्यासातून त्या रोगाचा प्रसारस्त्रोत अन्य प्राण्यांत आढळल्याचे सिद्ध झाले. यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की हे प्राणी अशा बाजारात आणले कुणी. खरे तर मानवाचा आणि वटवाघूळांचा अधिवास पूर्णत: वेगळा आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील ‘ओले बाजार’ बंद करा, अशा सूचना दिल्या आहेत. वटवाघूळांच्या वसाहती उद्ध्वस्त झाल्या तर किटकांची संख्या प्रचंड वाढेल. यातून पिकांच्या उत्पादनात मोठी घट होऊन मानवी जीवनावर दुष्परिणाम होईल. त्यामुळे मानवाने चुका टाळून वटवाघूळांना आरोपीच्या पिंजºयात टाकण्यापेक्षा निसर्गातील हस्तक्षेप टाळला पाहिजे, असा सल्ला वटवाघूळ तज्ज्ञ अनिरूद्ध चावजी यांनी दिला.
वटवाघुळांची उपयोगिता
वटवाघूळांमध्ये २० टक्के फळभक्ष्यी व ८० कीटकभक्ष्यी असतात. फळभक्ष्यी वटवाघूळांमुळे निसर्गाची परिसंस्था निरोगी राहते. बहुविध फळ-झाडांची बियाणे रूजविण्याचे काम वटवाघूळांकडून विष्ठेद्वारे होते. हा उडणारा एकमेव सस्तन प्राणी आहे. वटवाघूळे मार्गक्रमण व शिकारीसाठी प्रतिध्वनी स्थाननिर्धारण तंत्र म्हणजे ‘इको-लोकेशन’चा वापर करतात. या तंत्राद्धारे एका तासात १,२०० व एका रात्री सहा ते सात हजार डासांच्या आकाराचे किटक खाऊ शकतात. रात्री अंधारात पाण्यातून मासे पकडू शकतात, इतके चित्तथरारक तंत्रज्ञान त्याला अवगत आहे. ‘नाईट व्हीजन’ कसे असते, हे मानवाने वटवाघूळाकडून शिकण्याची गरज आहे, अशी माहिती चावजी यांनी दिली.