वनविभागाच्या कार्यालयावर कामगारांचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 05:00 AM2022-02-19T05:00:00+5:302022-02-19T05:00:44+5:30
वनविभाग व सीएसटीपीएसच्या उदासीन भूमिकेमुळे वीज केंद्रातील कंत्राटी कामगार भोजराज मेश्राम या कामगाराला पट्टेदार वाघाने ठार केले. तत्पूर्वी कामगार संघटनेने यापूर्वी निवेदनदेखील दिले होते. निवेदनावर त्वरित कार्यवाही केली असती तर कामगाराचा जीव वाचला असता. कोणतीही कारवाई न झाल्यामुळे कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन परिसरात मागील अनेक वर्षांपासून पट्टेदार वाघ, बिबटे तसेच इतर हिंसक जंगली प्राण्यांचा वावर आहे. दरम्यान, दोन दिवसात दोघांचा बळी घेतला आहे. या प्राण्यामुळे कामगार तसेच नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वाघ तसेच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा. या मागणीसाठी मनसेचे नगरसेवक तथा मराठी कामगार सेना महाराष्ट्र राज्य सचिव सचिन भोयर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी वनविभागाच्या कार्यालयावर नागरिकांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी वनविभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होेते.
वनविभाग व सीएसटीपीएसच्या उदासीन भूमिकेमुळे वीज केंद्रातील कंत्राटी कामगार भोजराज मेश्राम या कामगाराला पट्टेदार वाघाने ठार केले. तत्पूर्वी कामगार संघटनेने यापूर्वी निवेदनदेखील दिले होते. निवेदनावर त्वरित कार्यवाही केली असती तर कामगाराचा जीव वाचला असता. कोणतीही कारवाई न झाल्यामुळे कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान, वनविभागाच्या उदासीन भूमिकेच्या निषेधार्थ सर्व कामगार संघटनांनी व कामगारांनी एकत्रितरीत्या वनविभाग कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.
वनविभाग व सीएसटीपीएस प्रशासनाविरोधात कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
चंद्रपूर वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक आर. प्रवीण यांनी मोर्चाला मोर्चातील शिष्टमंडळासोबत चर्चा करून त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मनसेचे नगरसेवक तथा मराठी कामगार सेना महाराष्ट्र राज्य सचिव सचिन भोयर, नगरसेवक तथा कंत्राटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष बंडू हजारे, युवासेना कैलास तेलतुंबडे, अमोल मेश्राम, प्रफुल्ल संगोरे, प्रमोद कोल्हारकर, इंटकचे नीताई घोष, शिटू वामन बुटले, मनसेचे नितीन भोयर, गजानन जवादे, शंकर बागेसर, मंगेश चौधरी, कामगार क्रांती संघटनेचे रवींद्र चांदेकर, विजय केळझकर आदी उपस्थित होते.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
वनविभागाच्या कार्यालयावर कामगारांनी मोर्चा काढला. कामगार तसेच नेत्यांचा आक्रोश लक्षात घेता काही अनूचित घटना होऊ नये. यासाठी पोलिसांनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता.