कृषी पंपांची थकबाकी ६१ कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:58 PM2017-10-25T23:58:53+5:302017-10-25T23:59:04+5:30
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात कृषी पंपधारकांकडील असलेल्या वीजबिल थकबाकीचा आकडा ६१ कोटी ९७ लाखांवर पोहोचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात कृषी पंपधारकांकडील असलेल्या वीजबिल थकबाकीचा आकडा ६१ कोटी ९७ लाखांवर पोहोचला आहे. थकबाकीदार कृषी पंपधारकांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम वीज कंपनीकडून हाती घेण्यात आली असून चालू एक वर्षाच्या बिलाची थकबाकी न भरल्यास कृषी पंधारकाचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.
महावितरणद्वारे चंद्रपूर परिमंडळात अनेक ग्राहकोपयोगी योजना सुरू आहेत. या योजनांच्या माध्यमातून थकबाकीदारांना दिलासा मिळत आहे. मात्र अशा योजनानंतरही अनेक ग्राहक थकीत बिलाचा भरणा करण्यास दिरंगाई करीत आहेत. एकीकडे महावितरणकडून अनेक कामे सुरू असताना कृषी पंपधारकांकडून वीज बिलाची वसुली मात्र अत्यल्प आहे. याचा फटका बसून महावितरणला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणने पाऊल उचलत चालू एक वर्षाचे देयक व थकबाकीची रक्कम कृषी पंपधारकांनी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
चालू वर्षाच्या देयकाव्यतिरिक्त उर्वरीत थकबाकीही टप्प्याटप्प्याने कृषी पंधारकांनी भरण्याचे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले आहे. तसेच कृषी पंपधारक वीज ग्राहकांचे रोहित्र जळाल्यास अथवा बंद पडल्यास ते दुरूस्त करण्यापूर्वी कृषी पंपधारकांनी कृषी पंपावर योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर बसविणे अत्यावश्यक आहे. योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर बसविला असल्याची खातरजमा केल्यावरच नवीन रोहित्र देण्याचे निर्देश आहेत. योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर बसविला असल्यास महावितरणच्या वीजवहन यंत्रणेवर ताण येत नसतो तसेच कृषी पंपधारकांच्या पंपास योग्य वीजपुरवठा मिळूण ते जळण्याची शक्यता नसते, असे त्यांनी म्हटले आहे.
विभागनिहाय थकबाकी
चंद्रपूर परिमंडळांतर्गत असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली मंडळातील चंद्रपूर, वरोरा, बल्लारपूर, गडचिरोली, आलापल्ली व ब्रम्हपूरी अशा सहाही विभागातील कृषी पंपधारकांकडे ६१ कोटी ९७ लाखांची थकबाकी आहे. यात चंद्रपूर विभागातील कृषी पंपधारकांकडे २ कोटी १३ लाख २१ हजार, वरोरा विभागात १६ कोटी ८० लाख ७१ हजार, बल्लारपूर विभागात १७ कोटी ७८ लाख ४ हजार, गडचिरोली विभागात ७ कोटी ४२ लाख ८३ हजार, आलापल्ली विभागात ६ कोटी ६८ लाख ५७ हजार व ब्रम्हपूरी विभागात ११ कोटी १४ लाख १३ हजार रूपये थकबाकी आहे.