घोडाझरीचा ‘ओव्हरफ्लो’
By admin | Published: July 24, 2016 12:45 AM2016-07-24T00:45:52+5:302016-07-24T00:45:52+5:30
पूर्व विदर्भातील पावसाळी पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलावाचा ‘ओव्हरफ्लो’ अगदी टप्प्यात आहे.
पावसाळी पर्यटकांना खुणावतोयं !
नागभीड : पूर्व विदर्भातील पावसाळी पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलावाचा ‘ओव्हरफ्लो’ अगदी टप्प्यात आहे. गेल्या दोन वर्षाच्या ‘गॅप’ नंतर हा तलाव ओव्हरफ्लो होत असल्याने पावसाळी पर्यटकांच्या नजरा या ओव्हरफ्लोकडे खिळल्या आहेत.
खरेतर या तलावाची निर्मिती इंग्रजांनी १९०५ मध्ये केली. तीन बाजुला नैसर्गिक टेकड्या असून एका बाजुला बांध घालून हा तलाव निर्माण करण्यात आला आहे. या तलावाची निर्मिती करताना परिसरातील शेतीसाठी सिंचन हाच प्रमुख उद्देश इंग्रजांचा असावा. पण आता सिंचनासोबतच घोडाझरी पर्यटनासाठीच अधिक प्रसिध्द झाले आहे, असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून घोडाझरीची प्रसिद्धी पूर्व विदर्भात झाली आहे. म्हणूनच नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन घोडाझरीला वर्षभर भेटी देत असतात. पण घोडाझरी पूर्ण भरल्यानंतर सांडव्यावरुन होणाऱ्या ओव्हर फ्लोचा आनंद घेण्याची जी मजा असते ती मजा काही औरच असते. २०१३ मध्ये असा ओव्हर फ्लो निघाला होता. त्यानंतर दोन वर्ष पुरेशा पावसाअभावी हा ओव्हर फ्लो निघालाच नाही. त्यामुळे पावसाळी पर्यटकांची घोर निराशा झाली.
या दोन वर्षानंतर यावर्षी पडलेल्या पावसावरून त्याचा अंदाज आणि घोडाझरी तलावातील साठवणूक झालेल्या पाण्याची स्थिती लक्षात घेतली तर हा तलाव आता लवकरच ओव्हरफ्लो होईल, असे संकेत दिसतात. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार ओव्हरफ्लो होण्याला आता केवळ तीन फुट पाणी शिल्लक आहे. तालुक्यात पुन्हा एकदा दमदार पाऊस झाला तर हा तलाव ओव्हर फ्लो होऊ शकतो.
केवळ चंद्रपूर जिल्ह्यातीलच नाही तर पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यातील पर्यटकांचेही या ओव्हरफ्लोकडे नजर खिळून आहे. सभोवती डोंगर त्या डोंंगरावरील हिरवीगर्द वनराई आणि मधोमध विशाल असे घोडाझरी जलाशय. हे मनोरम दृश्य नजरेत साठविण्यासाठी या कालावधीत रोज हजाराच्या संख्येतील पर्यटक या ठिकाणी येत असतात. याशिवाय या ओव्हर फ्लोमध्ये आंघोळीची मजासुद्धा वेगळीच असते. (तालुका प्रतिनिधी)