कोळशाची ओव्हरलोड वाहतूक धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:03 AM2017-09-28T00:03:15+5:302017-09-28T00:03:27+5:30
कोळसा खाणीतून वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवून होेणारी कोळसा वाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे.
प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : कोळसा खाणीतून वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवून होेणारी कोळसा वाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. ओव्हरलोड कोळसा वाहतुकीने अल्पावधीतच रस्त्याचे तीनतेरा वाजले आले. त्यामुळे अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र या कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीवर आळा घालणार कोण, हा नागरिकांचा प्रश्न आहे.
राजुरा तालुका काळ्या सोन्याचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खाणीतून दिवसरात्र ओव्हरलोड कोळशाची वाहतूक सुरु आहे. रस्त्याची क्षमता नसतानाही कोळशाची जड वाहने रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे अल्पावधीतच रस्त्याचे तीनतेरा वाजले आहे. ओव्हरलोड कोळसा वाहतुकीदरम्यान कोळसा अंगावर पडून नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र अशी कोळशाची ओव्हरलोड वाहतूक सुरु राहिल्यास या घटनेची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही, अशी एखादी घटना घडल्यास जबाबदार कोण राहणार, हा प्रश्न खरेतर संबधित अधिकाºयांची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे.
राजुरा तालुक्यात गोवरी, पोवनी, सास्ती, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. ही गावे वेकोलिच्या डेंजरझोन परिसरात येतात. प्रदूषणाच्या सर्वाधिक झळा या गावातील नागरिकांना सहन कराव्या लागतात. वेकोलित मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण आहे. त्यामुळे वेकोलित काम करणाºया कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र वेकोलिचे जबाबदार अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. गोवरी डीप कोळसा खाणीतून होेणारी ओव्हरलोड वाहतूक गोवरी- पोवनी- कवठाळा या मार्गाने होते. दिवसरात्र या मार्गावर ट्रकांचे आवागमन होते. त्यामुळे गोवरी- पोवनी या मुख्य रस्त्याचे अल्पावधीतच बारा वाजले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. वेकोलितून होणारी ओव्हरलोड कोळसा वाहतूक थांबावी, यासाठी गोवरी, पोवनीवासीयांनी वेकोलिला अनेकदा निवेदन दिले. मात्र वेकोलिच्या मुजोर अधिकाºयांनी याकडे लक्ष दिले नाही. परंतु हीच वाहतूक आज नागरिकांच्या जिवावर उठली आहे.
ताडपत्रीचा वापरच नाही
कोळसा वाहतूक करताना वाहनचालकांना काही नियम आखून दिले आहे. वाहतूक करताना त्यावर ताडपत्री झाकणे बंधनकारक आहे. ओव्हरलोड वाहतूक करु नये, यासाठी नियम घालून दिले असताना या नियामांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.
कोळसा खाणीतून होणारी वाहतूक नियमबाह्य आहे. ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्याची दैनावस्था झाली असून कोळशाची ओव्हरलोड वाहतूक नागरिकांच्या जिवावर उठली आहे. यावर आळा घालणे गरजेचे आहे. नाहीतर एक दिवस ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरेल.
- भास्कर जुनघरी, नागरिक गोवरी