ओव्हरलोड वाहने गावकऱ्यांनी अडविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 11:33 PM2017-12-23T23:33:47+5:302017-12-23T23:33:59+5:30
रस्त्याची क्षमता नसतानाही दररोज ओव्हरलोड वाहने चालवून रस्त्याची दैनावस्था करण्यात आली आहे. यामुळे त्रस्त होऊन पाळसगाव येथील गावकऱ्यांनी शनिवारी नंदोरी-पळसगाव मार्गावरून जाणारी सर्व ओव्हरलोड वाहने अडवून धरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : रस्त्याची क्षमता नसतानाही दररोज ओव्हरलोड वाहने चालवून रस्त्याची दैनावस्था करण्यात आली आहे. यामुळे त्रस्त होऊन पाळसगाव येथील गावकऱ्यांनी शनिवारी नंदोरी-पळसगाव मार्गावरून जाणारी सर्व ओव्हरलोड वाहने अडवून धरली.
माजरीवरून तीन कि.मी. अंतरावरील पळसगाव येथून नंदोरी- विसलोन मार्गे ओव्हरलोड दहा चाकी हायवा ट्रक, टिप्परची माती व मुरूम घेऊन अनधिकृतरित्या वाहतूक सुरू आहे. हा मार्ग जडवाहनांसाठी नसून नंदोरी व वरोरा येथील टोलनाका वाचविण्यासाठी या मार्गाने वाहतूक केली जात आहे. पळसगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी या वाहतुकीला वारंवार विरोध केला. तरीही ही वाहतूक सुरूच आहे. वणी -वरोरा मार्गावर काम करणाऱ्या कंत्राटदाराने मागील दोन महिन्यांपासून आपली मुजोरी कायम ठेवली आहे. यामुळे नंदोरी-विसलोन-पळसगाव या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता वेकोलि माजरीच्या सीएसआर निधी अंतर्गत तयार करण्यात आला आहे. सध्या या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, हा रस्ता वेकोलिने बांधला असल्याने बांधकाम विभागानेही या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सामाजिक कार्यकर्ता जीवन रोडे यांनी वेकोलि व बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिली आहेत. सध्या सर्वत्र रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे. मात्र हा रस्त्याची दैनावस्था कायमच आहे. पळसगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत एक ठराव घेऊन पळसगाव मार्गावरून जड वाहतूक बंद केली आहे. असे असतानाही येथून जडवाहतूक सुरूच आहे. त्यामुळे त्रस्त होऊन शनिवारी ग्रा.पं.पदाधिकारी व गावकऱ्यांनी सर्व जडवाहने अडवून धरली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप झाडे, अरूण जोगी, प्रकाश निब्रट, महेश निब्रट, गिरीधर धवस, संतोष कोडापे व गावकरी उपस्थित होते.