परदेशामध्ये गाडी चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरणही करता येणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:27 AM2021-08-29T04:27:46+5:302021-08-29T04:27:46+5:30
चंद्रपूर : केंद्र सरकारने नुकताच आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. भारतीय दूतावासात जाऊन याबाबतची ...
चंद्रपूर : केंद्र सरकारने नुकताच आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. भारतीय दूतावासात जाऊन याबाबतची प्रक्रिया परवानाधारकांना करता येणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचा पुन्हा नवीन परवाना काढण्याच्या कटकटीपासून मुक्ती मिळाली आहे. उच्च शिक्षण, नोकरी, पर्यटक, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अनेक जण विदेशात जातात. तेथे वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचा परवाना काढतात. परवान्याची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा नवीन आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढावा लागायचा. मात्र आता परवान्याचे नूतनीकरण ज्या देशात असाल त्या देशातून करता येणार आहे. त्यासाठी ‘सारथी’ या प्रणालीवर जाऊन अथवा त्या देशातील भारतीय दूतावासात जाऊन अर्ज केल्यानंतर लगेच परवान्याचे नूतनीकरण करता येणार आहे. त्यामुळे नव्याने पुन्हा आंतरराष्ट्रीय परवाना काढण्याची डोकेदुखी थांबणार आहे.
बॉक्स
असा काढा आंतरराष्ट्रीय वाहन परवाने
परदेशात वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना गरजेचा आहे. परवाना काढण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आली आहे. अर्जदाराला ‘सारथी’ या साइटवरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. सध्याचा परवाना, व्हिसा जोडून ही प्रक्रिया होते. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करूनच वाहन परवाना दिला जातो. एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येते. या परवान्याची मुदत केवळ एक वर्षासाठी असते.
बॉक्स
कोण काढतो हा वाहन परवाना
शिक्षक, नोकरी, व्यवसाय, पर्यटनासाठी अनेक जण परदेशात जातात. त्यांना वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय परवाना गरजेचा असतो. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्याला हा परवाना मिळू शकतो. त्यासाठी परदेशात जाण्याचा व्हिसा गरजेचा असतो. संपूर्ण कागदपत्र तपासणी केल्यानंतर अर्जदाराला वाहन परवाना दिला जातो.
बॉक्स
पूर्वी आंतरराष्ट्रीय परवान्याचे नूतनीकरण करता येत नव्हते. उपप्रादेशिक कार्यालयातच येऊन नवा परवाना काढता येत होता. मात्र आता ऑनलाइन पद्धती सुरू झाल्याने ‘सारथी’ या साइटवरून भारतीय दूतावासात जाऊन परवान्याचे नूतनीकरण करता येणे शक्य आहे.
- किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर
----
बॉक्स
कोरोना काळात संख्या घटली
२०१८ २२
२०१९ ३८
२०२० ०६
२०२१ ०६