मालकाला गंभीर मारहाण करून चोरीची कार पेटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 11:27 PM2018-04-03T23:27:01+5:302018-04-03T23:27:01+5:30
घरासमोरील कार चोरीला गेल्याची बाब लक्षात येताच सकाळी कार मालकाने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आधी तुम्हीच वाहनाचा शोध घ्या नंतर गुन्हा दाखल करू, असा सल्ला दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : घरासमोरील कार चोरीला गेल्याची बाब लक्षात येताच सकाळी कार मालकाने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आधी तुम्हीच वाहनाचा शोध घ्या नंतर गुन्हा दाखल करू, असा सल्ला दिला. यानंतर कार मालकच वाहनाच्या शोधात निघाला. जुनोना परिसरात त्याला कार उभी होती. मात्र कारमध्ये दोघेजण बसून होते. त्यांना कारबाबत विचारणा करताच त्या दोघांनी कार मालकाला बेदम मारहाण केली. जीवाच्या भीतीने कारमालक तेथून काही अंतरावर धावत जाताच, त्या दोघांनी ती कार पेटवून दिली. ही थरारक घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
घटनेनंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले असता त्यांनी आरोपींचा पाठलाग केल्याने एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. नंतर त्याला अटक करण्यात आली. उत्कर्ष नागोसे (२४) रा. लालपेठ असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दीपक लक्ष्मण टवलारकर रा. बाबूपेठ हे कार मालक असून त्यांना गंभीर मारहाण करण्यात आली.
पोलीस सूत्रानुसार, दीपक लक्ष्मण टवलारकर हे आपली कार (क्रमांक एमएच ३४ एफ २५२५) सोमवारी रात्री आपल्या घरासमोर उभी करून घरी झोपले होते. मंगळवारी सकाळी टवलारकर उटले तेव्हा त्यांना दारात कार न दिसल्यामुळे त्यांनी इतरत्र शहानिशा करून शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तुम्ही पहिले शोध घ्या, नाही मिळाले तर तक्रार दाखल करून घेऊ असा सल्ला दिला.
यानंतर टवलारकर यांनी शहर पिंजून काढले. या शोधात ते जुनोना परिसरात पोहचले असता, जुनोना परिसरात त्यांची कार रस्त्याच्या बाजुला उभी असल्याचे निदर्शनास आले. मात्र कारमध्ये दोघेजण बसून होते. यावेळी टवलारकर यांनी त्या दोघांना आपल्या वाहनाबद्दल विचारपूस केली असता, त्यांनी शिवीगाळ करून टवलारकर यांना गंभीर मारहाण केली. जीव वाचविण्यासाठी टवलाकर हे तेथून दूर पळून गेले. यानंतर त्या दोघांनी कारची तोडफोड करून आग लावली. या आगीत कारचा जळून कोळसा झाला.
कार उभी दिसताच टवलाकर यांनी पोलिसांना माहिती दिली होती. यामुळे काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी पाठलाग करून उत्कर्ष नागोसे या आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळविले. यानंतर या घटनेची सविस्तर तक्रार टवलारकर यांनी शहर पोलीस ठाण्यात नोंदविली. या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३७९, ४२५, ३२३, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार एस. एस. भगत यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मानकर करीत आहेत. अटकेतील आरोपीने टवलारकर यांना पोलिसांसमक्ष जीवे मारण्याची धमकी दिली, अशी माहिती पोलीस सुत्राने दिली.