हंगामपूर्व मशागतीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:15 PM2018-05-21T23:15:11+5:302018-05-21T23:16:05+5:30
जिल्ह्यातील बहुतांश कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या जलचक्रावर अवलंबून राहावे लागते. गतवर्षी तालुक्यात सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या जलचक्रावर अवलंबून राहावे लागते. गतवर्षी तालुक्यात सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली. बोंडअळीच्या आक्रमणाने कापूस उत्पादक शेतकरी संकटात आला. कर्जमाफीचा फायदाही झाला नाही. तरीही आगामी वर्षाची तजवीज करण्यासाठी बळीराजाने खरीप हंगामाची पूर्व तयारी सुरू केली आहे. निसर्ग आतातरी साथ देणार म्हणून बळीराजा शेतीच्या मशागतीला लागला आहे.
जिल्ह्यात चार लाखाहून अधिक हेक्टरवर खरीप पिकाची लागवड केली जाते. यामध्ये भात, कापूस व सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठे आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा कमी करून कापसाला प्राधान्य दिले. अल्पपावसामुळे भात पिकाला मोठा फटका बसला. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली आदी धान पट्ट्यातील अनेक भागात सिंचनाची सुविधाच नसल्यामुळे व निसर्गाच्या जलचक्राने दगा दिल्याने भात पिकांचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला होता. अशातच कापसाचे पीक जोमात असताना बोंड अळीच्या आक्रमणाने शेतकऱ्यावर अरिष्ट ओढावले होते.
शेतकºयांना कधी सुलतानी, तर कधी अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो. तरीही वर्षभराच्या भाकरीची तरतूद म्हणून शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीला लागल्याशिवाय गत्यंतर नाही. जीव एकवटून तो मशागत करतो. परंतु खर्च अधिक व उत्पन्न कमी या चक्रव्यूहातून आजघडीला तरी बळीराजाची सुटका नाही. ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा डोलारा कृषी व्यवसायावरच अवलंबून आहे. पण निष्ठूर शासन व्यवस्था शेतकºयांच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचे दिसत नाही. यामुळेच उत्तम शेती व्यवसाय अशी एकेकाळची घोषणा आता बेकार शेती व्यवसाय अशी झाली आहे.
जिल्ह्यात शेतकरी खरीप हंगामात भात, तूर, कापूस, सोयाबीन, मिरची, मूग आदी पिके घेतात. यामध्ये भात व कापसाचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक आहे. अन्य कडधान्य पिकाचे क्षेत्र जेमतेम आहे. एकूण खरिपाचे पेरणी क्षेत्र चार लाखांहून अधिक हेक्टर असले तरी मागील वर्षी कृषी विभागाने आखलेल्या पेरणी क्षेत्रात घट झाली होती. निसर्गाचे जलचक्रच बिघडले आहे. यामुळेच शेती पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. तरीही शेतीशिवाय पर्याय नाही म्हणून बळीराजा जीव एकवटून शेतीच्या मशागतीला लागला आहे.
यंदा शेतकऱ्यांना आशा
यावर्षी उन्हाळा अतिशय कडक जात आहे. हवामान खात्याने पाऊसही दमदार होईल, असा अंदाज वर्तविला आहे. २९ मे रोजी मान्सून केरळात धडकणार असल्याची खूशखबर हवामान खात्याने दिली आहे. याचाच अर्थ दोन दिवस आधी म्हणजे ५ जूनलाच मान्सून राज्यात सक्रिय होईल, असाही अंदाज आहे. यामुळे बळीराजा सध्यातरी आनंदात आहे. यंदा पाऊस बरा झाला तर मागील वर्षीचे नुकसानही भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
बोंडअळीच्या नुकसानीच्या भरपाईची प्रतीक्षा
शेतकऱ्यांचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. कृषी विभागाने कापूस पिकांवर आलेल्या बोंडअळीच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या. नुकसान भरपाई देण्याची शासनाने घोषणा केली. आज न उद्या नुकसान भरपाई मिळणार म्हणून शेतकºयांना आशा होती. बी-बियाणे व खताचे नियोजन करण्यास उपयोगी पडणार म्हणून शेतकरी सुखावला. मात्र शेतीच्या मशागतीला लागूनही बोंडअळीच्या नुकसानीचे अनुदान न मिळाल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
बल्लारपुरात कपाशीचा पेरा वाढला
बल्लारपूर तालुक्यात दोन वर्षापूर्वी एकूण खरीप हंगामातील ९ हजार ३७९ हेक्टरपैकी तब्बल पाच हजार ४५६ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड केली जात होती. याकडे शेतकºयांनी पाठ फिरवून कापूस पिकाला पसंती दिली. मात्र शासनाने कापूस पिकाला पीक विमा योजनेतून हद्दपार केल्याने मोठ्या तालुक्यातील शेतकºयांना फटका बसला. बल्लारपूर तालुक्यात भात पिकाचे एकूण पेरणी क्षेत्र २ हजार ५७६ हेक्टर इतके आहे.