खनिज क्षेत्र कल्याण निधीतून भात रोवणी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:19 AM2021-06-10T04:19:52+5:302021-06-10T04:19:52+5:30
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा भात उत्पादनाकरिता प्रसिद्ध असून, जिल्ह्यात सन २०२०-२१ या खरीप हंगामात १ लाख ८२ हजार ११८ ...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा भात उत्पादनाकरिता प्रसिद्ध असून, जिल्ह्यात सन २०२०-२१ या खरीप हंगामात १ लाख ८२ हजार ११८ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली. पारंपरिक पद्धतीमध्ये भात पीक घेण्याकरिता वेळेवर व पुरेशा प्रमाणात शेत मजूर उपलब्ध होत नसल्याने रोप लावणी उशिरा होते. परिणामी उत्पादनात घट होते. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. आधुनिक पद्धतीने भात पिकाची शेती करणाऱ्याकरिता शेतमाल उत्पादक कंपनीमार्फत शेतकऱ्यांना एकूण ५० भात रोवणी यंत्र (नर्सरी) ट्रे सह उपलब्ध करून दिले आहे.
भात पीक लागवड तंत्रज्ञानांतर्गत भात रोवणी यंत्रासारख्या सुधारित औजारांच्या वापरामुळे लागवडीचा वेळ व मनुष्यबळाची बचत होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात भात पिकाची उत्पादकता वाढण्यास मदत होईल. या आधुनिक पद्धतीचा अवलंब करून बियाणे ट्रे मध्ये पेरणी केल्यास एकरी १० ते १२ किलो बियाण्यांमध्ये १५ ते २० दिवसांत सुदृढ रोपे तयार होतात. सदर पद्धतीमध्ये ट्रे मध्ये बियाणे लागवड केल्यास एकसारखी रोपे कमी कालावधीत तयार झाल्यामुळे योग्य वेळेत लागवड करता येते. तसेच वेळेची बचत होऊन १ एकर भात क्षेत्राची २ तासांत लागवड होते. एका भात रोपाला ४५ ते ५० फुटवे निघतात व सदर सुधारित लागवड पद्धतीमध्ये दोन झाडांमधील व दोन ओळींतील अंतर योग्य व एकसारखे असल्याने रोग व किडीचे प्रमाण कमी असते.
भात लोंब्याची प्रती एकर संख्या जास्तीत जास्त असल्यामुळे सरासरी हेक्टरी १० ते १५ क्विंटलने उत्पादनात वाढ होते. सुधारित भात पीक पद्धतीमध्ये वेळेत तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड झाल्यामुळे लागवडीच्या एकरी खर्चामध्ये दीड हजारांपर्यंत बचत होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात रोवणी यंत्राच्या साहाय्याने भात पिकाची लागवड करावी. सदर यंत्र शेतकरी उत्पादक कंपनीकडे उपलब्ध आहे. त्यांच्याशी संपर्क साधून भात रोवणी यंत्र भाड्याने प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.