धान उत्पादक शेतकरी अधोगतीला
By admin | Published: January 18, 2015 11:19 PM2015-01-18T23:19:28+5:302015-01-18T23:19:28+5:30
शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा तसेच शेतमाल विक्रीमध्ये फसवणूक होवू नये, यासाठी आधारभूत किमती ठरवून दिल्या आहेत. मात्र ज्या मुल्यांकनाने शेतमालाची
नीळकंठ नैताम - पोंभुर्णा
शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा तसेच शेतमाल विक्रीमध्ये फसवणूक होवू नये, यासाठी आधारभूत किमती ठरवून दिल्या आहेत. मात्र ज्या मुल्यांकनाने शेतमालाची आधारभूत किंमत ठरविण्यात आली. त्यामध्ये शेतमाल उत्पादकांवर एकप्रकारे अन्यायच केला जातो. आजच्या घडीला शेतमालाला देण्यात येणारा भाव म्हणजे शेती व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याला अडचणीत आणण्यासारखा आहे. ज्या भावात शेतमालाची विक्री करावी लागते ते भाव परवडण्यासारखे नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात मुख्यत्त्वे धानाचे पिक घेतले जाते. धान उत्पादक परिसर म्हणून ओळखला जाणारा हा तालुका असून या परिसरातील शेतकरी विविध प्रकारच्या चांगल्या प्रतिच्या धानाचे उत्पन्न घेतात. परिसरातील शेतकरी व शेतमजुरांचे जीवनमान हे केवळ धान उत्पादनावर अवलंबून आहे. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे पूर्ण झाली असतानाही धान उत्पादक शेतकरी आजही प्रगती ऐवजी अधोगतीकडेच जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
भारत कृषी प्रधान देश आहे देशातील शेतकरी सुखी तर देश सुखी असे अनेक नेते शासनकर्ते नेहमी आपल्या भाषणातून सांगतात. मोठ-मोठी आश्वासने देतात. परंतु शेतकऱ्यांना मात्र काहीच मिळत नाही. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे.
शेतकरी खरीप हंगामात जवळपास पाच ते सहा महिने कुटूंबासह राबतो. एवढेच नव्हे तर रब्बी हंगामात राबून शेतीतून उत्पादन काढतो. विविध प्रकारच्या पिकांची लागवड करून उत्पादीत मालाची विक्री करून आपली व कुटुंबाची उपजिवीका भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात काबाडकष्ट करतो. मात्र त्याला हव्या त्या प्रमाणात मोबदला मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली सापडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे.
यासाठी शासनाचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. या परिसरात सिंचनाच्या सोयी नाहीत. बी-बियाणे, खत, मजुरी, किटकनाशके, औषधी यांचे भाव गगनोला भिडले आहेत. धानाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक येऊन शेतकरी घाट्यात शेती व्यवसाय करीत आहे. उत्पन्न कमी झाले तरी कर्ज काढून शेतकरी दरवर्षी चांगले उत्पादन होईल व कर्जाची परतफेड करून नुकसान भरपाई करता येईल या आशेने शेती करतो. परंतु निसर्गाचा लहरीपणा व धान पिकांवर होणारा विविध रोगांचा प्रादुर्भाव, जंगली वन्य प्राण्यांकडून होणारी सततचे नुकसान यामुळे पिकाची मार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. परिणामी शेतकरी नेहमीच संकटात सापडतो.
तालुका परिसरामध्ये कोणताही उद्योग व कारखाना नसल्याने शेतकऱ्याला धान शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. परिसरात शेतीला जोडधंदा नसल्याने शेती उत्पन्नाच्या बळावरच कुटुंबातील गरजा, मुला-मुलींचे लग्न, शिक्षण, आजार आदी बाबी सांभाळाव्या लागतात. ‘पिकली तर शेती, नाही तर माती’ अशी परिस्थिती स्वातंत्र्याच्या ६६ वर्षानंतरही परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांची आहे.
शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक मदत करावी. धानाला योग्य हमी भाव देण्यात यावा. रासायनिक खते, औषध सवलतीच्या दरात देण्यात यावे, सिंचनाची सोय उपलब्ध करून द्यावी आणि शेतकऱ्यांची अधोगती सुधारण्यासाठी नवनवीन योजना राबवावञयात. जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.\