धान संशोधकाची आजाराशी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:31 AM2018-05-11T00:31:10+5:302018-05-11T00:31:10+5:30
ग्रामीण भागातील तांदळाचे संशोधक म्हणून महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध असणारे नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे सध्या दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत. अर्धांगवायूने त्यांचे शरीर सुन्न झाले. शासनाने उपचारासाठी मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्रामीण भागातील तांदळाचे संशोधक म्हणून महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध असणारे नागभीड तालुक्यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे सध्या दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत. अर्धांगवायूने त्यांचे शरीर सुन्न झाले. शासनाने उपचारासाठी मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
१९८३ मध्ये ते तांदळाचे संशोधक म्हणून समोर आले. त्यांचे शिक्षण जेमतेम इयत्ता तिसरीपर्यंत झाले. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणसुद्धा घेता आले नाही. मात्र त्यांनी आपल्या शेतात धान पीक लावून त्यात तांदळाचे संशोधन केले. दादाजींनी धान संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. आता त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. एचएमटीसारख्या वाणाची निर्मिती करणाऱ्या या कृषितज्ज्ञाचे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. सरकार आणि समाजालाही आज या सच्चा संशोधकाची आठवण राहिलेली नाही.
शरद पवारांपासून ते डॉ. अब्दुल कलामांपर्यंत अनेकांनी त्यांना सन्मानित केले आहे. परंतु मान-सन्मानांनी पोट भरत नाही, या वास्तवाचा अनुभव दादाजींचे कुटुंबीय घेत आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनावर अनेक लोक श्रीमंत झाले; पण दादाजींची परिस्थिती आहे तशीच आहे. एक मुलगा, सून आणि तीन नातवंडे, असा त्यांचा परिवार आजही मोलमजुरी करूनच जगतो आहे. अंथरुणाला खिळलेल्या या संशोधकाची उपेक्षा कधी संपणार, हा खरा प्रश्न आहे.
अवघ्या दीड एकर शेतीत त्यांनी धानपिकाचे विविध यशस्वी प्रयोग केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत फोर्ब्सने २०१० मध्ये जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते. ५ जानेवारी, २००५ रोजी अहमदाबाद येथे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर २००६ मध्ये महाराष्ट्र शासनानेदेखील त्यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
त्यांच्या नावावर ९ धान वाण विकसित करण्याचा विक्रम आहे. त्यांनी विकसित केलेली धानाची प्रजाती आजही देशाच्या विविध भागात उत्पादित केली जाते. सामान्यातून आलेल्या या धान संशोधकाला तीन वर्षांपूर्वी अर्धांगवायूने ग्रासले. तीन वर्षांपासून ते अंथरुणावर खिळले आहेत. आपले ज्ञान उदारपणे लोकांना वाटणाºया दादाजींना आयुष्याच्या उत्तरार्धात लहान-लहान गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे. शासनाकडे केलेली मदतीची मागणी अद्याप दुर्लक्षित आहे. मात्र सोशल मीडियावर सुरु असलेले 'दादाजी खोब्रागडे मदत अभियान' शासन स्तरावर खळबळ उडवून गेले आहे.
शोधलेले वाण
एचएमटी, विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू, हे नऊ तांदळाचे वाण दादाजी खोब्रागडे यांनी विकसित केले आहे.
बाबाला आजपर्यंत शंभराहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मात्र आता मदतीची गरज असताना शासनाकडून मदत मिळेणासी झाली आहे. शासन मदत करायला तयार नसेल तर मिळालेल्या पुरस्काराची होळी करेन.
-मित्रदीप खोब्रागडे ,
दादाजींचा मुलगा.