पोंभुर्णा तालुक्यात शुद्ध पाण्याचे एटीएम देणार
By admin | Published: May 6, 2017 12:41 AM2017-05-06T00:41:03+5:302017-05-06T00:41:03+5:30
पोंभुर्णा तालुक्यातील शुद्ध पेयजलाची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा.
सुधीर मुनगंटीवार : पाणी व स्वच्छता पार्कचे लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील शुद्ध पेयजलाची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. या तालुक्यामध्ये गावांना आरोच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे केले.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे. तसेच शौचालय, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन या संदर्भातील आदर्श व्यवस्थेची तोंडओळख व्हावी, यासाठी पोभुर्णा पंचायत समिती कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या पाणी व स्वच्छता पार्क लोकार्पण सोहळ्यात ना. मुनगंटीवार बोलत होते. या पार्कच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेचे लोकशिक्षण होईल. स्वच्छता अभियानातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मदत होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर मनपाच्या महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, भोंभुर्णा पंचायत समिती सभापती अलका आत्राम, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रीजभूषण पाझारे आदी उपस्थित होते.
पिण्याचे पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन गावांगावात होणे आवश्यक असून त्याकरिता आदर्श शौच खड्डयांची निर्मिती करण्यात यावी. शरीरातील ९५ टक्के आजार हे अशुध्द पाण्यामुळे होतात. त्यामुळे स्वच्छतेसोबतच आरोग्यदायी पेयजलाची प्रत्येकाला आवश्यकता असते. जिल्हयातील दोन गावांमध्ये आरोच्या पाण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. येथे आरो पाण्याचे एटीएम उघडण्यात आले आहे. त्यामुळे गावातील आजारांवर नियत्रण आले आहे. पोंभुर्णा भागातील पाण्याची प्रत चांगली नसलेल्या ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छ पाणी पुरवठयासाठी जिल्हा परिषदेने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. विद्युत सोलरपंप व अन्य आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात प्रस्ताव द्यावा. राज्यातील आरोयुक्त पाण्याचा पुरवठा केला जाणारा तालुका पोंभुर्णा असेल, असे आश्वासन पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.