पेंटर, गवंडीने पटकावली ‘बीआरओ’मध्ये नोकरी
By साईनाथ कुचनकार | Published: August 11, 2023 06:45 PM2023-08-11T18:45:06+5:302023-08-11T18:45:14+5:30
एक वर्षाचे आयटीआयमध्ये प्रशिक्षण आणि मिळाली सरकारी नोकरी
चंद्रपूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकविल्या जाणाऱ्या एकूण ट्रेडमध्ये पेंटर आणि गवंडी या ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा ओढा फारच कमी असतो. काही मोजकेच विद्यार्थीच दरवर्षी प्रवेश घेतात. मात्र, या ट्रेडलाही इतर ट्रेडइतकेच महत्त्व असल्याचे चंद्रपुरातील पाच विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. या विद्यार्थ्यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये निवड झाली आहे.
थेट शासकीय नोकरीची संधी मिळाल्याने पुन्हा एकदा आयटीआयच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांमध्ये आयटीआयच्या विद्यार्थ्यांना पाहिजे त्या प्रमाणात नोकरीची संधी नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात नैराश्य आले होते. मात्र, या विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे हे नैराश्य काही प्रमाणात का, होईना दूर झाले आहे.
पेंटर व्यवसायाचे प्रशिक्षण घेतलेले शुभम कांबळे, अनिरुद्ध सोनुलकर आणि सुमित घरत या तीन विद्यार्थ्यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये पेंटर (टेक्निशियन) या पदाकरिता, तर गवंडी व्यवसायाचे प्रशिक्षण घेतलेले उद्देश मानकर आणि प्रेम खंडालकर या दोन विद्यार्थ्यांची निवड मेसन (टेक्निकल) करिता निवड झाली आहे.
या व्यवसायापैकी पेंटर आणि गवंडी हे दोन असे व्यवसाय आहेत की, ज्यात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी विशेष उत्साही नसतात. मात्र, स्वयंप्रेरणेने प्रशिक्षण घेतलेल्या पाचजणांना शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळाली आहे.
ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या आणि व्यवसाय प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या नवयुवकांसाठी हा ट्रेड म्हणजे त्याला मिळालेली सुवर्णसंधी आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी असे विविध प्रशिक्षण घेऊन रोजगार, स्वयंरोजगार मिळविल्यास नक्कीच बेरोजगारीवर मात करता येऊ शकते.
- रवींद्र मेहेंदळे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर.