२० लाखांत विक्री झालेल्या मोदींच्या ‘त्या’ चित्राचे चित्रकार चंद्रपूरचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 07:46 PM2019-11-09T19:46:10+5:302019-11-09T19:46:34+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईचा आशीर्वाद घेत असल्याच्या छायाचित्राला ई-लिलावात २० लाख रुपयांना विकले गेले. ही कलाकृती चंद्रपूरचे प्रसिद्ध चित्रकार चंदू पाठक यांची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईचा आशीर्वाद घेत असल्याच्या छायाचित्राला ई-लिलावात २० लाख रुपयांना विकले गेले. ही कलाकृती चंद्रपूरचे प्रसिद्ध चित्रकार चंदू पाठक यांची आहे. गेल्या वर्षी १९ मार्च रोजी १९१८ रोजी दिल्ली येथील संसद भवनातील प्रधानमंत्री कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्याशी भेटी दरम्यान हे तैलचित्र भेट दिले होते, अशी माहिती चित्रकार चंदू पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
चंद्रपुरातील एका चित्राकाराच्या कलाकृतीला मिळालेला एवढा मोठा पुरस्कार हा त्या कलाकारासोबतच चंद्रपूरचाही गौरव वाढविणारा आहे. ही रक्कम नमामीगंगे योजनेसाठी दान केली जाणार आहे. चंद्रपुरातील चित्रकाराच्या कलाकृतीतून नमामीगंगे योजनेसाठी सहकार्य लाभले आहे.
आपल्या आईचा आशीर्वाद घेतानाच्या या तैलचित्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप प्रशंसा केली होती. हे तैलचित्र स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्या तैलचित्रावर ‘मातृदेवो भव’ नरेंद्र मोदी असा अभिप्राय देखील लिहिला. ही भेट माजी अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन घडवून आणली होती. विशेष म्हणजे मुनगंटीवार यांच्यासह चंद्रपूर मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे व प्रदीप अल्लूरवार हे या भेटीचे साक्षदार होते, अशी माहितीही चित्रकार चंदू पाठक यांनी यावेळी दिली.
दिल्ली येथील नॅशनल गॅलरी आॅफ मॉर्डन आर्ट येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेट वस्तूंची प्रदर्शनी केंद्रीय सांस्कृतिक खात्याद्वारे दि. १४ सप्टेंबर ते २४ आॅक्टोबर २०१९ पर्यंत आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान या भेट वस्तूंची ई - लिलावाद्वारे विक्री करण्यात आली. याद्वारे मिळालेली संपूर्ण रक्कम नमामीगंगे योजनेसाठी दान करण्यात येणार आहे. या विक्रीमध्ये चंद्रपूरचे चित्रकार चंदु पाठक यांनी पंतप्रधान मोदी यांना भेट दिलेल्या ‘नरेंद्र मोदी आपल्या आईचा आशीर्वाद घेत असल्याचा चित्राला रूपये २० लाख एवढी किंमत प्राप्त झाली. सदर चित्र ई - लिलावात २० लाख रूपयांना विकले गेले. हे चित्र सिनेअभिनेता अनिल कपूर किंवा अर्जुन कपूर यांनी घेतले असल्याचेही सांगण्यात आले आहे, अशी माहितीही चंदू पाठक यांनी दिली.