पाथरी एफडीसीएमच्या जंगलाला आग
By admin | Published: April 6, 2015 01:05 AM2015-04-06T01:05:31+5:302015-04-06T01:05:31+5:30
वनविकास महामंडळाच्या पाथरी वनपरिक्षेत्रातील पालेबारसा परिसरातील जनकापूर ते सामदाकडे जाणाऱ्या वनात मोठ्या
वन्यप्राण्यांना धोका : वनविभाग, एफडीसीएमचे एकमेकांकडे बोट
गेवरा: वनविकास महामंडळाच्या पाथरी वनपरिक्षेत्रातील पालेबारसा परिसरातील जनकापूर ते सामदाकडे जाणाऱ्या वनात मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. यामध्ये वनविकास महामंडळाची वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असून परिसरातील वनासह वन्यजीव व जैवविवीधता धोक्यात आली आहे.
शासनाच्या वतीने वनविकासाच्या कोट्यावधीच्या योजना वनविकास महामंडळ व नियमित वनविभागामार्फत ग्रामसहभागातून राबविल्या जातात. यासाठी महत्त्वाची भूमिका या विभागांची असते. परंतु वनविकास महामंडळ व वनविभाग यांचे आपापसात सूत जुळत नाही. त्यामुळे कामे प्रभावित होत असल्याने अशाप्रकारच्या धोक्यातून जैवविवीधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मागील दोन दिवसांपासून जनकापूर ते सामदा मार्गावरील तीन ते चार किमी अंतरातील जंगल परिसरात मोठा धूर निघताना दिसला. प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता जंगलाला आग लागल्याचे दिसून आले. याबाबत संबंधित विभागाला भ्रमणध्वनीवरुन सूचना दिली. परंतु संबंधित विभाग ते आपले क्षेत्र नसल्याचे सांगतात. आता वनविकास महामंडळ व वनविभाग हे परस्पर दोन दिशेने चालणारे विभाग असल्याने अशा घटनाबाबत कुणीही दखल घेण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याचेच दिसून येत आहे. आगीमुळे वन्यजीव धोक्यात आले आहे. शिवाय सर्व कृत्रिम पाणवठेही शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत. त्यामुळे आगीच्या उष्णतेची दाहकता व उन्हाळ्याच्या उन्हाचा तडाखा वन्यप्राण्यांसाठी त्रासाचा ठरत आहे. (वार्ताहर)