पंचायत समिती सदस्य झाले नामधारी
By admin | Published: June 2, 2016 02:40 AM2016-06-02T02:40:43+5:302016-06-02T02:40:43+5:30
सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन ठेवून पंचायत समितीची निर्मिती करण्यात आली असली तरी पंचायत राजच्या त्रिस्तरीय व्यवस्थेत पंचायत समितीच्या
सरपंच होत आहेत हायटेक : सरपंचानांच अधिकार जास्त
नेरी : सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन ठेवून पंचायत समितीची निर्मिती करण्यात आली असली तरी पंचायत राजच्या त्रिस्तरीय व्यवस्थेत पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना नाममात्र अधिकार देऊन १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे. त्यामुळे सरपंचानाच अधिक प्रमाणात अधिकार मिळालेले आहेत. परिणामी चिमूर पंचायत समितीचे सदस्यगण पदापुरतेच नामधारी असल्याचे बोलले जात आहे.
एका पंचायत समिती सदस्याच्या क्षेत्रात ८-१० गावे येत असताना पंचायत समिती सदस्यांचा प्रवास भत्ता तुलनेने फारच कमी आहे. केंद्रात व राज्यात भाजप-सेनेच्या सरकारने पंचायत समिती सदस्यांना वेगळा निधी देण्यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी पंचायत समिती सदस्याकडून होत आहे. कामाचा निधी जिल्हा परिषद उपलब्ध करुन देते. त्यामुळे सरपंचाचे महत्व वाढले आहे. आठ-दहा गावांचा कारभार सांभाळणाऱ्या पंचायत समिती सदस्यांना कोणताच निधी दिला जात नसल्यामुळे राज्यातील पंचायत समिती सदस्यांनी आता आपल्याला निधी मिळावा म्हणून राज्य शासनाकडे मागणी केल्याची चर्चा आहे. पंचायत समिती सदस्यांना त्यांच्या अखत्यारीतील गावांचा दौरा करण्यासाठी किलोमीटरच्या अंतराप्रमाणे प्रवास भत्ता देण्यात येतो. हा प्रवास भत्ता अतिशय कमी प्रमाणात आहे. (वार्ताहर)