समस्या निवारणासाठी आता पंचायत मित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2016 12:54 AM2016-01-10T00:54:41+5:302016-01-10T00:54:41+5:30
बऱ्याचदा ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कामानिमित्त तालुक्यातील कार्यालयात ये-जा करावी लागते.
कामे होणार झटपट : जिवती पंचायत समितीची अभिनव संकल्पना
संघरक्षित तावाडे जिवती
बऱ्याचदा ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कामानिमित्त तालुक्यातील कार्यालयात ये-जा करावी लागते. परंतु त्या व्यक्तीचे काम एका दिवसात होणारच असे नाही. आठवडा, पंधरवाडा तर कधी कधी महिने-दोन महिने कार्यालयात येरझारा माराव्या लागतात. समन्वयाचा अभाव किंवा अन्य कारणे याला कारणीभूत असतील. पण येरझाऱ्या मारणाऱ्या नागरिकांना मात्र आर्थिक भुर्दंडासोबत शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. मात्र यापुढे जिवती तालुक्यातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागणार नाही. कारण जिवती पंचायत स्तरावर नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन त्याचे लगेच निवारण करण्यासाठी पंचायत मित्र ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
जिवती येथील संवर्ग विकास अधिकारी उमेश नंदागवळी यांनी ‘पंचायत मित्र’ ही संकल्पना लोकहितासाठी राबविण्यात येत असल्याचे सांगितले आणि ही संकल्पना राबविणारी चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती पंचायत समिती राज्यात एकमेव आहे, असा दावाही संवर्ग विकास अधिकारी उमेश नंदागवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
काळाची व कामाची निकड लक्षात घेता ग्रामीण भागातून येणाऱ्या विविध अडचणी व तक्रारीवर मात करून गाव पातळीवर पंचायत मित्र स्वयंसेवकाची निवड केली जाणार आहे. समाजकार्याची आवड असणाऱ्या सुशिक्षित व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीची पंचायत मित्र स्वयंसेवक म्हणून निवड केली जाणार आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून ही निवड होईल.
पंचायत मित्राच्या माध्यमातून गावपातळीवर पंचायत समितीशी निगडीत असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामध्ये गावातील ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेणे, त्याची माहिती पंचायत समितीच्या मदत केंद्रात देणे, त्याविषयी ग्रामस्थात समुपदेशक करणे, गावातील समस्यांचा गावपातळीवर कार्यरत असणाऱ्या विविध शासकीय संस्थाशी संपर्क साधून पाठपुरावा घेणे, वेळोवेळी त्या समस्यांचा मागोवा घेणे, जटील समस्यांचे तज्ज्ञांच्या मदतीने मार्गदर्शन घेणे, यासारखी अनेक कामे केली जाणार आहेत. सदर कामाबाबत पंचायत समितीच्या प्रत्येक विभागातील प्राथमिक माहितीचे प्रशिक्षण पंचायत मित्राला दिले जाणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणे सोयीचे होईल.
शासकीय कार्यालयात विविध कामासाठी नागरिकांना सतत मारावे लागणारे हेलपाटे, शासकीय कार्यपद्धतीमुळे लोकांची होणारी मानसिक व शारीरिक कुचंबणा, कार्यालयात जनतेला तासन्तास ताटकळत उभे राहणे तसेच कार्यालयीन अस्वच्छता, अधिकारी-कर्मचारी यांची अरेरावी, नियोजनाचा अभाव, कामात सुसुत्रता नसणे, समन्वयाचा अभाव, कामातील विलंब, असे चित्र शासकीय कार्यालयात सर्रासपणे दिसते. परंतु यापुढे अतिमागास, दुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील पंचायत समितीने हा कलंक पुसून टाकण्याचे ठरविले आहे. संवर्ग विकास अधिकारी नंदागवळी यांच्या नाविण्यपूर्ण संकल्पनेतून पंचायत समिती ‘हेल्प डेस्क’ साकारत आहेत. त्यामुळे इतर वेळी सर्वसामान्यांशी बोलताना उग्र वाटणारा आवाज आता सौम्य व सामंजस्यांचे रूप घेणार आहे. त्यासाठी पंचायत समितीमधील सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांना कामानिमित्त येणाऱ्या लोकांचे स्वागत, संभाषण कौशल्य, समन्वय, व्यक्तिमत्त्व विकास यासारख्या आवश्यक बाबींचे वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पंचायत समितीच्या या उपक्रमामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असला तरी अंमलबजावणीवही बरेच अवलंबून असणार आहे.