पंचायत समितीमध्ये फॉगिंग मशीन धूळ खात
By admin | Published: October 3, 2015 12:52 AM2015-10-03T00:52:47+5:302015-10-03T00:52:47+5:30
डासांना मारण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून ब्रह्मपुरीच्या पंचायत समितीला १५ फॉगिंग मशिन दिल्या.
वाटप करण्याकडे दुर्लक्ष : शासनाच्या निधीचा दुरूपयोग
ब्रह्मपुरी : डासांना मारण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून ब्रह्मपुरीच्या पंचायत समितीला १५ फॉगिंग मशिन दिल्या. परंतु गेल्या दोन महिन्यापासून मशिनी नादुरुस्त असल्याने पंचायत समितीच्या गोडाऊनमध्ये धूळ खात पडून आहेत., त्यामुळे शासकीय निधीचा वापर लोकोपयोगी होत नसल्याचे दिसून येत आहे.
प्रचंड उष्मा वाढल्याने शहरासह ग्रामीण भागात डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डासांमुळे मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजाराची लागण चांदगाव, दुधवाही या खेड्यात होऊन बळी गेल्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. पण शासकीय निधीतून दिलेल्या साहित्यांचा वापर होत नसल्याने हे साहित्य शोभेची वस्तू बनून राहिल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीना डांसाच्या प्रतिबंध करण्यासाठी फॉगिग मशीनचे वाटप करण्यात आले. परंतु त्या १५ मशिन निकृष्ट दर्जाच्या असल्याने त्यांचा उपयोग होत नाही. पर्यायाने पंचायत समितीच्या गोडावून मध्ये त्या मशीन धूळ खात पडलेल्या असल्याने ग्रामपंचायतींना समस्येला तोंड द्यावे लागत आहे. संबंधित विभागाने मशिन कुठे पाठवायचे आहे, याची यादी दिली नाही तसेच त्यांची टेस्टिंग करण्यासाठी अजूनही टेक्निशियन पाठविला नसल्याने १५ मशीन दोन महिन्यांपासून धूळ खात पडल्याने यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)