'ती' जखमी वाघीण आजही धडपडतेय उपचारांसाठी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2022 12:44 PM2022-12-05T12:44:50+5:302022-12-05T12:47:40+5:30
वन्यप्रेमींमध्ये चिंता
सुनील घाटे
वासेरा (चंद्रपूर) : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफरझोनमधील शिवणी वनपरिक्षेत्र अंतर्गत पांगडी परिसरात एक वाघीण जखमी अवस्थेत काही पर्यटकांना दिसून आली. पांगडी बफरक्षेत्रात त्यांना ही बलाढ्य वाघीण गाय मारताना दिसून आली. बारकाईने निरीक्षण केले असता त्यांना वाघीण मागच्या पायाने लंगडत चालत असल्याचे दिसून आले. तिला आता उपचाराची लगेच गरज आहे.
एका पायाने लंगडत असल्यामुळे तिला शिकारही व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळे तिने आपला मोर्चा आता बफरक्षेत्र आणि गावाकडे वळविला आहे. गावातील जनावरे मारून ती तिची भूक शांत करीत आहे. ती चालण्यासाठी धडपडत होती आणि ती केलेली गायीची शिकार सांभाळून ठेवण्यासाठी आणि आपल्या बछड्यांच्या उदरभरण्यासाठी धडपडत असल्याचे पर्यटकांना दिसून आले.
ती जखमी झाली आहे. तिला उपचाराची नितांत गरज आहे. मागच्या पायाजवळ मोठी जखम तर नसेल याची चिंता वन्यजीवप्रेमींना वाटत आहे. जर वेळीच तिला जेरबंद करून तिच्या जखमेवर उपचार केले नाही तर काय होईल, सांगता येत नाही. विशेष म्हणजे ती सध्या आपल्या दोन बछड्यांचीही काळजी घेत आहे. बछड्यांना अद्याप शिकार करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या उदरभरण्याची जबाबदारीही या जखमी वाघिणीकडे आहे. नैसर्गिक शिकार करताना अडचण जाईल तेव्हा खाण्याची सोय करता येत नाही आणि त्यामुळे ती आणखीच हताश होण्याची दाट शक्यता आहे.
एक वाघही त्याच परिसरात
विशेष म्हणजे, आणखी एक बलाढ्य वाघ त्याच परिसरात वावरत असल्याचे सांगण्यात येत आहे. या जखमी वाघिणीने पुन्हा आपल्या जिवाचे रक्षण करण्यासाठी त्या वाघासोबत जोरदार संघर्ष केला. त्यामुळे तिला आणखी दुखापत झाली तर नसेल ना, हाही प्रश्न आहे. तिला दोन बछडे असल्याने त्यांच्याही उदरभरणाची जबाबदारी तिच्यावर आहे. त्यांच्यासाठी तिला शिकार आणावी लागत आहे. तेव्हा वेळीच वनविभागाने लक्ष घालून तिला व तिच्या बछड्यांना जेरबंद करून उपचार करावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून होत आहे.
वाघिणीच्या फोटोवरून तिच्या पायाचे हाड तुटल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत वाघिणीला वाऱ्यावर सोडता येणार नाही. ती धावून नैसर्गिक शिकार करू शकत नाही. त्यामुळे वाघिणीसोबत बछड्यांची उपासमार होऊ शकते. अशा परिस्थितीत वाघीण व दोन बछडे यांचे रेस्क्यू आपरेशन करून वैद्यकीय मदत तातडीने पुरवावी लागेल.
- कवडू लोहकरे, वन्यप्रेमी, चिमूर