पेपर मिल कर्मचाऱ्यांचे पगार आणि बोनसची रक्कम मिळणार
By admin | Published: February 11, 2017 12:39 AM2017-02-11T00:39:26+5:302017-02-11T00:39:26+5:30
बल्लारपूर पेपर मिल सुरू झाले व कागद उत्पादन सरू झाले आहे. आता, कामगारांना पगार तसेच बोनसच्या थकीत रकमेतील काही भाग याच महिन्यात मिळणार आहे.
पत्रकार परिषद : पेपर मिल मजदूर सभेची माहिती
बल्लारपूर : बल्लारपूर पेपर मिल सुरू झाले व कागद उत्पादन सरू झाले आहे. आता, कामगारांना पगार तसेच बोनसच्या थकीत रकमेतील काही भाग याच महिन्यात मिळणार आहे. गुरुवारी बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेने पत्रकार परिषदेत तशी माहिती दिली.
सन २०१४-१५ च्या सुपर बोनस मधील काही रक्कम याच फेब्रुवारी महिन्यात देण्यात येईल. थकीत चार महिन्यांतील एक महिन्याचा पगारही मार्चच्या आत दिला जाणार आहे. त्यानंतर नियमितपणे त्या त्या महिन्याचा पगार दिला जाईल व त्या चालू पगारासोबत थकीत रक्कम टप्प्याटप्याने वाटप करण्यात येणार आहे. पेपर मिल सुरू झाल्यानंतर बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी बिल्टचे मुख्य संचालक निहार अग्रवाल यांना पत्र पाठवून कामगारांची असलेली थकीत रक्कम लवकर देण्यात यावी अशी मागणी केली होती. या मागणीबाबत बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे पदाधिकारी तारासिंग कलशी, रामदास वागदरकर, वीरेंद्र आर्य यांच्याशी चर्चा करून पगार व थकीत रक्कम देण्यात येईल असे सांगितले.
बांबू या कच्च्या मालाचा अभाव आणि त्यामुळे आलेले आर्थिक संकट हे पेपर मिल बंद होण्याचे कारण होते. पेपर मिल व्यवस्थापनाने कच्च्या मालाची व्यवस्था केली तसेच बँकेशी बोलणी करून मिलच्या उत्पादनात आर्थिक अडचण होणार नाही, असा मार्ग काढला, अशी माहिती पत्रकार परिषदेत देऊन हे पेपर मिल आता नियमित सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बंद पेपर मिल सुरू करण्याकरिता पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी प्रयत्न केले असे पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे कामगारांवर कोसळलेले संकट आता दूर होण्याचे चिन्ह असून पेपर मिल नियमित सुरू राहावी, अशी अशा व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)