परप्रांतीय बोगस डॉक्टरांचा धुमाकूळ
By admin | Published: June 18, 2016 12:37 AM2016-06-18T00:37:35+5:302016-06-18T00:37:35+5:30
तालुक्यातील अनेक गावांमध्ये बोगस पंरप्रातीय डॉक्टरांनी धुमाकूळ घातला आहे. चुकीच्या औषधोपचाराने रूग्णांवर औषधोपचार केला जात असल्याने गोरगरीब जनतेचा जीव धोक्यात आला आहे.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : रूग्णांच्या जीवाशी खेळ
कोरपना : तालुक्यातील अनेक गावांमध्ये बोगस पंरप्रातीय डॉक्टरांनी धुमाकूळ घातला आहे. चुकीच्या औषधोपचाराने रूग्णांवर औषधोपचार केला जात असल्याने गोरगरीब जनतेचा जीव धोक्यात आला आहे. याकडे आरोग्य विभागाने वेळीच लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कोरपना तालुक्यात बहुतांश नागरिक हे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात. या गरीब नागरिकांच्या अज्ञानाचा व गरजेचा पुरेपुर फायदा घेत प्रत्येक गावात परप्रांतीय बोगस डॉक्टरांनी आपले दवाखाने थाटले आहे. कुठल्याही वैद्यकीय शाखेचे प्रमाणपत्र नसताना हे बोगस डॉक्टर राजरोसपणे वैद्यकीय व्यवसाय थाटून जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत. कमी अनुभवाच्या आधारे रुग्णावर उपचार करुन रोज हजार, दोन हजार रुपये कमवित आहेत. हा गोरखधंदा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे.
महत्त्वाची बाब अशी की, रुग्णाना तातडीने बरे वाटावे यासाठी सर्व बंगाली डॉक्टर ‘स्टिरोइट डेक्झा डौथक्लो’ या सारख्या औषधाचा फॉर्म्यूला आत्मसात केला आहे. या औषधांने रुग्णांना तात्पुरते बरे वाटते. परंतु, या औषधाचे दुष्परिणाम शरीराच्या प्रत्येक अवयवावर होतो. अशी अनेक जीवघेणे औषधे डॉक्टराच्या बॅगमध्ये असल्याचे नागरिक सांगतात. या औषधाचा त्रास शरीरावर होत असल्याने मूत्रपिंड, यकृत व मूळव्याध, किडणी असे गंभीर आजार अनेकांन जडले आहेत. तसेच बॉम्बे मार्केट यासारख्या कंपनीच्या गोळ्या देऊन प्रत्येक रूग्णाजवळून २०० ते ३०० रुपयाची लूट या डॉक्टरांकडून सुरू आहे. ग्रामीण भागात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने रुग्णांना या बोगस परप्रांतीय डॉक्टराकडे उपचारासाठी जावे लागते. या बोगस डॉक्टरांवर नजर ठेवण्याची व त्यांची तक्रार करुन कारवाई करण्याची जबाबदारी शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टराची आहे. परंतु, कारवाई होत नसल्याने त्यांचा गोरखधंदा वाढल आहे. (शहर प्रतिनिधी)
बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी
गांगलवाडी : ब्रह्मपुरी तालुक्यातील जवळपास सर्वच गावात बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटली आहे. त्यांच्याकडून रुग्णांवर अघोरी उपचार केला जात असून या बोगस डॉक्टरांकडे कोणताही व्यवसाय करण्याचा परवाना नाही. मात्र हे बोगस डॉक्टर खुलेआम व्यवसाय करीत आहेत. या बोगस डॉक्टरांमुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून आरोग्य विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बोगस डॉक्टर हे उपचारासाठी पावरफुल औषधांचा उपयोग करीत असून असे औषध या बोगस डॉक्टरांना कोण पुरविते, याचा शोध देखील घेणे गरजेचे आहे. त्यांना औषधे पुरवठा करणाऱ्यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच काही औषधी वितरक ठोक औषधी विक्रीचा परवाना नसताना देखील या तालुक्यातील औषधी दुकानदारांना व अशा बोगस डॉक्टरांना औषधी पुरवठा करतात. यावरुन आरोग्य प्रशासनाचा यावर अंकुश नसल्याचे दिसते. ब्रह्मपुरी तालुक्यातील बोगस डॉक्टरांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून संबंधीत अधिकाऱ्यांनी या बोगस डॉक्टरावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)
आशीर्वाद कुणाचा?
अनेक वेळा निवेदन तसेच वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित होऊनही या बोगस डॉक्टरावर कारवाई होत नाही. उलट त्यांना व्यवसाय करण्यास पाठबळ दिले जाते. तेव्हा त्यांना कुणाचा आशीर्वाद आहे, अशी चर्चा नागरिकांत आहे.