प्रेरणादायी प्रवास; गरिबीवर मात करीत 'तो' बनला अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 05:57 PM2022-04-20T17:57:56+5:302022-04-20T18:09:51+5:30
एम.टेक. पूर्ण केल्यानंतर त्यांनी सहा.प्राध्यापक म्हणून पारुल युनिव्हर्सिटी बडोदा गुजरात येथे ११ महिने काम केले. सहा.प्राध्यापकपदाचा राजीनामा देऊन त्यांनी पुढे अभ्यास चालू केला.
नागभीड (चंद्रपूर) : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. यात पारडी (ठवरे) येथील युवक रंजित देवीदास रामटेके यांची उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट अ म्हणून मृद व जलसंधारण विभागामध्ये निवड झाली आहे. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर आपण पुढे जाऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. रंजितचे हे उदाहरण ग्रामीण भागातील युवकांना प्रेरणादायीच आहे.
रंजित देवीदास रामटेके यांचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण गावीच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पारडी (ठवरे) येथे झाले. सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बा.) येथून पूर्ण केले. पुढे रंजितला बी.ई. करायचे होते. परंतु घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्यामुळे ते करता आले नाही. परिस्थितीमुळे त्यांनी मजुरीची कामे केली. टॉवर बांधणीची कामे केली. मोलमजुरीची कामे करीत राहिले. मात्र शिक्षणाचा ध्यास सोडला नव्हता म्हणून शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरी येथे प्रवेश घेतला आणि पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण केले.
पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण करतानाच ते शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घ्यायचे. अशातच पुढे अनेकांच्या मदतीने त्यांनी बी.ई. एम.आय.टी. पुणे येथून पूर्ण केले. यात त्यांना त्यांच्या बहिणी आणि मित्रपरिवार यांचे आर्थिक सहकार्य लाभले. आयआयटी रुडकी येथे शिक्षण घेत असताना शासनातर्फे शिष्यवृत्ती मिळाली.
प्राध्यापकाच्या नोकरीत मन रमले नाही
एम.टेक. पूर्ण केल्यानंतर त्यांनी सहा. प्राध्यापक म्हणून पारुल युनिव्हर्सिटी बडोदा गुजरात येथे ११ महिने काम केले. सहा.प्राध्यापकपदाचा राजीनामा देऊन त्यांनी पुढे अभ्यास चालू केला. त्यानंतर ते उपविभागीय अधिकारी म्हणून संरक्षण संपदा कार्यालय जोधपूर येथे रुजू झाले. मधल्या काळात रंजित विविध विभागाच्या पदासाठी पात्र ठरले. मात्र यात त्यांचे मन रमले नाही. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निकाल जाहीर केला. त्यात रंजित देवीदास रामटेके यांची उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट अ म्हणून मृद व जलसंधारण विभागामध्ये निवड झालेली आहे. याही पुढे त्यांना मोठा टप्पा गाठायचा आहे.