शाळा प्रशासनाविरोधात पालकांचा एल्गार
By admin | Published: June 5, 2016 12:40 AM2016-06-05T00:40:41+5:302016-06-05T00:40:41+5:30
वरोरा शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आता मात्र या शहरात शिक्षणाचा गोरखधंदा सुरु झाला असून शिक्षण शुल्काच्या नावाने अवाढव्य पैशाची मागणी ....
प्रकरण पोलिसात : शिवाजी विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकार
वरोरा : वरोरा शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आता मात्र या शहरात शिक्षणाचा गोरखधंदा सुरु झाला असून शिक्षण शुल्काच्या नावाने अवाढव्य पैशाची मागणी करणाऱ्या तसेच विद्यार्थ्याना शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रिका देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विरोधात पालकांनी एल्गार पुकारला. जोपर्यंत शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रिका देणार नाही तोपर्यंत वर्गात बसणार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यानी घेतल्यामुळे खळबळ उडाली. शिक्षण विभाग शाळा व्यवस्थापनावर काय कारवाई करते, याकडे सर्व पालकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून वरोरा शहरातील कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून खासगी शिकवणी वर्ग सुरु आहे. शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय व या शिकवणी वर्ग संचालकाच्या तोंडी करारानुसार पूर्ण शिकवणी वर्ग घेणार असून विद्यार्थ्याचा प्रवेश मात्र शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात होणार होता, असे पालकांचे म्हणणे आहे.
आता निकाल लागल्यानंतर शनिवारी विद्यार्थी व पालक शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रिका मागायला गेले असता क्लिअरन्सच्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्यांकडून अडीच हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास टीसी मिळणार नाही, अशी ताकीद महाविद्यालयाच्या अध्यक्ष रजनी लांबट यांनी दिली होती. मात्र पालकांनी याला विरोध दर्शवून पैसे भरण्यास नकार दिला. शेवटी प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. पोलीस निरीक्षकांना पालकांनी सर्व प्रकार सांगितला. परंतु हे प्रकरण शिक्षण विभागाशी संबंधित असल्यामुळे पंचायत समितीमध्ये जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला.
संतापलेल्या पालकांनी पंचायत समितीमध्ये जाऊन सभापती सुनंदा जीवतोडे यांना निवेदन देत सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष देत शाळेकडे कूच केली. शुल्क न घेता गुणपत्रिका व टीसी देण्याची मागणी करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)