शाळा वयवस्थापनाकडून पालकांची फसवणूक
By admin | Published: January 22, 2017 12:48 AM2017-01-22T00:48:31+5:302017-01-22T00:48:31+5:30
मागील अनेक वर्षांपासून खासगी लिटल एन्जल हॉयस्कूलमार्फत विना अनुदानित तत्वावर नर्सरीपासून तर दहावीपर्यंतचे वर्ग चालविले जात आहे.
पालकांचा आरोप : समिती सदस्यांच्या खोट्या स्वाक्षरीने पाठविला प्रस्ताव
वरोरा : मागील अनेक वर्षांपासून खासगी लिटल एन्जल हॉयस्कूलमार्फत विना अनुदानित तत्वावर नर्सरीपासून तर दहावीपर्यंतचे वर्ग चालविले जात आहे. शाळा व्यवस्थापनाकडून अनेक वर्षांपासून विद्यार्थी व पालकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप पाल्य व पालकवर्गांनी केला आहे. या उपर आणखी एक पाऊल टाकत शाळा व्यवस्थापनाने पालक शिक्षक समिती सदस्यांच्या खोट्या स्वाक्षरीने शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठविला आहे.
सदर संस्थेत आर टी ई कायदा २००९ चेदेखील पालन करण्यात येत नसून शासकीय शैक्षणिक कायदेदेखील पायदळी तुडविले जात आहे . सदर शैक्षणिक संस्थेत २५ टक्के आर्थिक व दुर्बल घटकांच्या पाल्यांना प्रवेश देण्यासंबंधी आर टी ई कायदा २००९ मध्ये स्पष्ट नमूद असतानादेखील आजपर्यंत एकही प्रवेश त्या पद्धतीने देण्यात आलेला नाही, असे पालकांचे म्हणणे आहे.
सदर शैक्षणिक संस्थेने २५ टक्के आर्थिक व दुर्बल घटकांतर्गत ज्या पालकांच्या पाल्यांचा प्रवेश दाखविलेला आहे, त्यांच्या पालकांनादेखील या संबंधी काहीच माहिती नसल्याचे आढळून आले आहे. अशा पालकांकडून सर्वच प्रकारचे शुल्क सदर शैक्षणिक संस्थेने वसूल केलेले आहे. याबाबतचा पुरावादेखील पालकांजवळ असल्याचे समजते. ई-लर्निंग संच आजसुद्धा बंद असून शुल्क मात्र वसूल करण्यात येत आहे . डेव्हलपमेंट शुल्क आजही वसूल करण्यात येत आहे. मात्र शालेय विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मात्र उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. पिण्याच्या पाण्याची सोयदेखील नाही.
या संस्थेला स्टेट बोर्डची मान्यताच देण्यात आलेली होती. मात्र या संस्थेने कोणत्याही प्रकारची शासनाची मान्यता न घेता स्वमर्जीनेच कोणत्याही प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक न करता सीबीएससी पॅटर्न इयत्ता आठवीपर्यंत सुरु केलेला आहे. पाल्य, पालक व शासनाची १०० टक्के फसवणूकच केलेली आहे, असा आरोप पालकांनी केला आहे. लिटल एन्जल हॉयस्कूल वरोरा येथे आजपर्यंत शाळा शुल्क समिती स्थापन झालीच नसून संचालक मंडळाने शाळा शुल्क समिती स्थापन झाल्याची खोटी माहिती दिलेली असून त्या समितीत घेतलेल्या सदस्यांनादेखील याची काहीच माहिती नव्हती. सदर शैक्षणिक संस्थेची शाळा शुल्क समिती व सर्वच सदस्यांची खोटी माहिती सादर केल्यामुळे त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पालकवर्गांनी केलेली आहे. (शहर प्रतिनिधी)
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेला बगल
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फतीने सर्वच वरिष्ठ अधिकारी तथा पदाधिकारी यांना या संबंधाची लेखी तक्रार कार्यवाहीस्तव सादर केली होती. वर्गात शिक्षणाधिकारी, संवर्ग विकास अधिकारी यांनी समस्त पी. टी. डब्लू. चे सदस्य व शाळा प्रशासन यांची स्वत:च्या उपस्थितीत संयुक्त सभा आयोजित केली होती. त्या सभेत तक्रारीच्या निवारणार्थ अनेक सूचना उपरोक्त दोन्ही अधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला दिलेल्या होत्या. सभेत सवार्नुमते ठरल्यानंतरही एकही सूचनेची आजपर्यंत प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालनही व्यवस्थापनाने केले नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे .
प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ
संस्था चालकांच्या चुकीच्या धोरणाबाबत पालकांनी रोष व्यक्त केला असून संबंधित अधिकाऱ्यांकडे संस्थाविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. या संदर्भात संस्था चालकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता मी प्रवासात आहे. सोमवारला प्रतिक्रिया देतो, असे सांगून प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.