पालकांचा शाळेवर बहिष्कार
By admin | Published: December 10, 2015 01:13 AM2015-12-10T01:13:24+5:302015-12-10T01:13:24+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाने शिक्षण अधिकारी अधिनियम अंमलात आणला.
खडसंगी: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाने शिक्षण अधिकारी अधिनियम अंमलात आणला. मात्र चिमूर तालुक्यातील सर्वांग विकास विद्यालयात मागील अनेक महिन्यांपासून विषय शिक्षक नसल्याने ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून शाळेवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे सावरगावात संस्था चालकांच्या वादात शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून तीन किलोमिटर अंतरावर माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी अनेक शाळा काढल्या आहेत. मात्र संस्था चालकांच्या मुजोरीने अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जिवनाशी खेळ केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चिमूरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या सावरगाव येथे क्रीडा शिक्षण विकास मंडळ चिमूरद्वारे सर्वांग विकास विद्यालय मागील २३ वर्षांपासून सुरु आहे. या शाळेत परिसरातील कारघाटा, चिखलापार, खरकाडा या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. सावरगावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा व ८ ते १० पर्यंत माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था आहे.
संस्था चालकानी विद्यार्थ्ळांच्या भविष्याचा विचार न करता आपल्या राजकीय वरदस्ताचा वापर करीत आतापर्यंत नऊ शिक्षकांना काढले. या बदल्यात तासिकेप्रमाणे शिक्षक नेमले यासाठी शिक्षण विभागाची मान्यताही घेतली नसल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे. या सत्रात मागील तीन महिन्याअगोदर इंग्रजी व गणित विषयाचे शिक्षकांना काढले. त्यामुळे तीन महिन्यांपासून विद्यार्थी गणित व इंग्रजीच्या तासिकेपासून वंचित झाले आहेत. (वार्ताहर)