पालकांनो सावधान ! प्रेम प्रकरणातून पलायन वाढले
By admin | Published: May 1, 2017 12:36 AM2017-05-01T00:36:50+5:302017-05-01T00:36:50+5:30
तालुक्यात गेल्या वर्षभरात दहा युवक-युवतींसह विवाहिता बेपत्ता झाल्या आहेत. यातील अनेक जोडपी लग्न बेडीत अडकली आहेत.
चिमूर तालुक्यात दहा अल्पवयीन जोडप्यांचे पलायन : पालकांसह पोलीस यंत्रणाही हैराण
चिमूर : तालुक्यात गेल्या वर्षभरात दहा युवक-युवतींसह विवाहिता बेपत्ता झाल्या आहेत. यातील अनेक जोडपी लग्न बेडीत अडकली आहेत. संबंधीतांच्या काही पालकांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रत्यक्षात पोलीस दप्तरी जरी दहा जणांची नोंद असली तरी ठाण्याबाहेर व तंटामुक्त समित्याद्वारे मिटविल्या जाणाऱ्या अशा प्रकरणाची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे पालकासह पोलीस यंत्रणाही हैराण झाली आहे. या प्रकरणामुळे पालकांनी वेळीच सावधान होण्याची वेळ आली आहे.
पळून जाणारे अनेकजण लग्न उरकूनच घरचा रस्ता धरत आहेत. तर अल्पवयीन असलेल्या युवक-युवतींना पालकांच्या हवाली नाही तर सुधारगृहात पाठवण्याची कसरत पोलिसांना करण्याची वेळ येत आहे. अनेक युवकांवर पास्को अंतर्गत कारवाई करावी लागत आहेत. त्यामुळे पालकांनो आता सावधान! म्हणण्याची वेळ येवून ठेपली आहे.
चिमूर तालुक्यातील चिमूर व भिसी या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकरणाची नोंद होत आहे. या सर्व घटनामागे प्रेमप्रकरण, एकतर्फी प्रेम व घरच्यांचा लग्नास विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील दोन विवाहिता आपल्या दोन मुलांना घरी सोडून शेजारील इसमासह बेपत्ता झाल्या आहेत. तर अलीकडेच काही महाविद्यायालयीन युवतीही आपल्या महाविद्यालयीन व शेजारी युवकांबरोबर बेपत्ता आहेत. यापैकी दोन युवतींना शोधून आणण्यास चिमूर पोलिसांना यश आले आहे.
अलीकडच्या काळात मोबाईलसह अन्य साधनांमुळे जग अगदी जवळ आले आहे. काहीजण शिक्षणासाठी शहरात जात असले तरी त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. पालकांचे पाल्याकडे होणारे दुर्लक्ष देखील त्याला कारणीभूत ठरत आहे. चित्रपटामुळेही सद्याचा युवक, युवतीच्या वागण्यामध्ये फरक पडला आहे. मुलीमध्ये तोंडाला स्कार्फ बांधण्याचे प्रमाण वाढले असून पालक देखील समोरून येणाऱ्या आपल्या पाल्याला ओळखेनासे झाले आहेत. (प्रतिनिधी)
लग्नासाठी अपेक्षा वाढल्या
आई-वडीलाना आपल्या पाल्यांना वधू-वर बघताना नाकी नऊ येत आहे. दोघांचेही शिक्षण चांगले होवूनही दोन्ही बाजूच्या वाढत्या अपेक्षा त्याला कारणीभूत ठरत आहेत. पाल्याने घरच्यांच्या विरोधात परजातीतील युवक अथवा युवतीशी लग्न केल्यास सुरुवातीला विरोध करणारे पालक शेवटच्या क्षणी मूक संमती देत असल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे.
काळानुरुप व्याख्या बदलल्या
भारतीय संस्कृतीवर पाश्मिात्य संस्कृती भारी पडत आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार महाविद्यालयीन युवक-युवतीमधील संबंधातील व्याख्या बदलत चालल्या आहेत. १५ वर्षाअगोदर प्रियकर व प्रेयशी असे संबोधले जात होते. मात्र आता ‘बायफ्रेंड’ व ‘गर्लफ्रेंड’ असे संबोधल्या जाते. हा प्रकार चक्क आपल्या पालकांनाही सांगितल्या जात आहे.
चिमूर पोलीस ठाण्याअंतर्गत एका वर्षात दहा युवक-युवती पळून जाण्याच्या घटनेची नोंद असली तरी बाहेर समेट घडवल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे पालकांनी पाल्यांच्या हालचालीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
- दिनेश लबडे, ठाणेदार, चिमूर.