पालकांनो, लहान मुले सांभाळा; डेंग्यूने काढले डोके वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 05:00 AM2021-10-03T05:00:00+5:302021-10-03T05:00:50+5:30
पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या रोगांपैकी डेंग्यूचा ताप हा जीवघेणा आजार मानला जातो. मात्र, गतवर्षी कोरोनाचा कहर सुरू असताना डेंग्यू तापाने बाधित होणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. या तापात रुग्णाच्या शरीरातील पेशी झपाट्याने कमी होऊ लागतात. पेशी म्हणजेच प्लेटलेट्स रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यात मदत करतात. शरीरातून वाहणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या बनवण्यास उपयुक्त असतात; पण याच पेशींवर डेंग्यूचा ताप घाला घालतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संसर्ग ओसरण्याच्या मार्गावर आहे. मात्र, चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. यापूर्वीच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी असली तरी सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे मुलांना हा ताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालकांनी विशेष खबरदारी घेऊन तातडीने डॉक्टरांकडे उपचार करण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणेने दिला आहे.
पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या रोगांपैकी डेंग्यूचा ताप हा जीवघेणा आजार मानला जातो. मात्र, गतवर्षी कोरोनाचा कहर सुरू असताना डेंग्यू तापाने बाधित होणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. या तापात रुग्णाच्या शरीरातील पेशी झपाट्याने कमी होऊ लागतात. पेशी म्हणजेच प्लेटलेट्स रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यात मदत करतात. शरीरातून वाहणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या बनवण्यास उपयुक्त असतात; पण याच पेशींवर डेंग्यूचा ताप घाला घालतो. शरीरातून जशी पेशींची संख्या कमी होत जाते. तशी रुग्णाची अवस्था अधिकच बिकट होत जाते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांना दाखवा
- डेंग्यूचा मच्छर चावल्यानंतर ३ ते ७ दिवसांदरम्यान डेंग्यूच्या तापाची लक्षणे दिसू लागतात. डेंग्यूचा मच्छर चावलेल्या रुग्णाला अचानकच खूप ताप येतो. थंडी वाजून येते. रुग्णाचे डोके दुखू लागते. सांध्यामध्ये होणाऱ्या वेदना आणि कमकुवतपणा सहन न झाल्याने अस्वस्थता येते. घशात कायम दुखणे सुरू असते.
डेंग्यूच्या तापाचे प्रकार
डेंग्यूचा ताप सामान्यत: तीन प्रकारचा असतो. सामान्य डेंग्यू, रक्तस्राव डेंग्यू, डेंग्यू शॉक सिंड्रोम या तिन्ही तापांची लक्षणे त्यांच्या प्रकारानुसार तीव्र होत जातात. ही लक्षणे साधारण डेंग्यूची आहेत. दुसऱ्या प्रकारातील डेंग्यूमध्ये रुग्णाची त्वचा पिवळी पडत जाते. अंग गरमऐवजी थंड भासू लागते.
कसा होतो डेंग्यूचा प्रसार?
डेंग्यू हा एक प्रकारचा व्हायरल ताप असतो. डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या मच्छरांचे बायोलॉजिकल नाव एडिस एजिप्ती असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सामान्य भाषेत या मच्छरांना टायगर मच्छर असेही म्हटले जाते. कारण त्यांच्या शरीरावर सफेद व काळ्या रेषा असतात. हे एडिस मच्छर घरातील स्वच्छ पाण्यातही जन्म घेऊ शकतात व त्यातच अंडीही घालतात, अशी माहिती जि.प. आरोग्य विभागाने दिली.