ऐतिहासिक शिवलिंग व नंदीच्या मूर्तीचा भाग पावसामुळे कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:32 AM2021-09-12T04:32:15+5:302021-09-12T04:32:15+5:30
चंद्रपूर: शहरातील ऐतिहासिक वारसापैकी एक असलेल्या अपूर्ण देवालय किंवा दशमुखी मूर्तीसमूहापेकी शिवलिंग व नंदीच्या मूर्तीचा पाया पावसामुळे खचला. यावर ...
चंद्रपूर: शहरातील ऐतिहासिक वारसापैकी एक असलेल्या अपूर्ण देवालय किंवा दशमुखी मूर्तीसमूहापेकी शिवलिंग व नंदीच्या मूर्तीचा पाया पावसामुळे खचला. यावर तातडीने उपाययोजना केली नाही तर हा मौलिक ठेवा नष्ट होण्याचा धोका आहे. इको प्रोने तात्पुरती ताडपत्री झाकली. पण, पावसामुळे एक-एक दगड ढासळत असल्याने भारतीय पुरातत्व विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी इको प्रोने निवेदनातून केली आहे.
लालपेठ मातानगर परिसरातील इको-प्रोचे कार्यकर्ते अब्दुल जावेद यांनी ऐतिहासिक अपूर्ण देवालयातील मूर्तींच्या पडझडीबाबत
इको-प्रो पुरातत्व विभागाचे बंडू धोतरे यांना माहिती दिली. त्यानंतर बिमल शहा, जयेश बैनलवार, सचिन धोतरे यांनी दशमुखी मूर्तीसमूहातील नंदी व शिवलिंग असलेल्या मूर्तीची पाहणी केली. सात दिवसापासून सततच्या पावसाने मूर्तीच्या पायव्यामधील दगड ढासळल्याने एका बाजूचा दगड बाहेर निघाला. शिवलिंग व नंदी एकाच दगडात मात्र वेगवेगळी असल्याने त्याचा भार सांभाळला गेला नाहीतर या दोन्ही मूर्ती खाली पडून तुटण्याचा धोका आहे. कमकुवत झालेल्या या भागाला बॅनर्स व ताडपत्रीने त्वरित झाकून पुढील हानी टाळण्याचा प्रयत्न इको-प्रो सदस्यांनी केले.
यासंदर्भात भारतीय पुरातत्व विभागकडून दुरुस्ती करण्याची मागणी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे. चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाची दखल घेउन भारतीय पुरातत्व विभागाने इको-प्रो संस्थेशी करार करीत जिल्हयातील २१ स्मारके दत्तक दिली आहे. ऐतिहासिक स्मारक जतन करण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. यात स्थानिक नागरिकांचा सहभाग मिळावा म्हणून आपला वारसा, आपणच जपू या हे अभियान राबविण्यात येत आहे. यासंदर्भात स्थानिक पुरातत्व अधिकारी यांना माहिती देण्यात आली आहे. संपूर्ण परिसराचे सौंदर्य करण्याची गरज असून ऐतिहासिक ठिकाण पर्यटकांना आकर्षित करण्यासारखे आहे.
बॉक्स
अपूर्ण देवालय व दशमुखी मूर्ती समूहाचा इतिहास
गोंडराजे धुंड्या रामशहा यांच्या कार्यकाळात सोळाव्या शतकात अपूर्ण देवालय व दशमुखी मूर्ती समूहाची निर्मिती झाली. बाबूपेठ परिसरातील बाभळीचे जंगल कापून गोंडराजांनी वसाहत उभारली. त्यामुळे यास बाबूपेठ असे नाव पडले. लागूनच भिवापूर पेठ वसविले. एकाच दगडात व रेतीच्या दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत. प्रत्येक मूर्तीचा आकार भव्य आहे. सर्व मूर्तीचे काम पूर्ण झाल्यावर एक शिवमंदिर बांधून त्यात शंकराच्या पिंडीची स्थापना करावी व आजूबाजूला इतर मूर्ती ठेवायच्या असा विचार असावा. मूर्ती समूहात १५ मूर्ती आहेत. दशमुखी मूर्ती ही २३ फूट लांब तर १८ फूट रुंद आहे. दोन ठिकाणी भेंगा पडल्या. पुरातत्व विभागाच्या संरक्षणामुळे टिकल्या आहेत.