स्वच्छता अभियानात सहकार्याच्या भावनेतून सहभागी व्हा
By Admin | Published: November 16, 2014 10:48 PM2014-11-16T22:48:15+5:302014-11-16T22:48:15+5:30
गावातील प्रत्येक रस्ता, प्रभाग व लोकवस्त्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा आढळून आल्यास नागरिकांनी तो परिसर स्वच्छ करून सामाजिक आरोग्य जपावे, प्रत्येकांनी जर सहकार्याच्या भावनेतून
गोंडपिपरी : गावातील प्रत्येक रस्ता, प्रभाग व लोकवस्त्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा आढळून आल्यास नागरिकांनी तो परिसर स्वच्छ करून सामाजिक आरोग्य जपावे, प्रत्येकांनी जर सहकार्याच्या भावनेतून काम केल्यास गाव स्वच्छ होईल, असे मत संवर्ग विकास अधिकारी यशवंत मोहीतकर यांनी व्यक्त केले.
गोंडपिपरी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी संपूर्ण देश स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी ‘राष्ट्रीय स्वच्छता मिशन’ अभियान राबविण्याचे आवाहन केले. यात राज्य, केंद्रीयमंत्री, अभिनेते, खेळाडू, अधिकारी यांना सहभागी होण्याची विनंती केली. राज्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छता मिशन अभियानात सहभागी होऊन अधिनस्त अधिकारी व ग्राम पातळीवरील कर्मचाऱ्यांना अभियान राबविण्याच्या सुचना दिल्या. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक पंचायत समितीचे उपसभापती रामचंद्र कुरवटकार, संवर्ग विकास यशवंत मोहीतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच सुनील डोंगरे, उपसरपंच देवेंद्र बट्टे, तंमुस अध्यक्ष अनिल झाडे, पंचायत विस्तार अधिकारी गुंतीवार, ग्राम पंचायत सदस्य सेवानंद आत्राम, ग्रामविकास अधिकारी दिलीप शिंदे व कर्मचाऱ्यांनी शहरातील जुना बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविले.यानंतर स्वच्छता अभियानाबाबतची जनजागृती करून प्रत्येक नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन केले. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरुण वासलवार, माजी सरपंच दीपक फलके, शैलेशसिंह बैस, कृउबा सभापती राजीव सिंह चंदेल, असलम शेख प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
नगर परिषदेचे दुर्लक्ष
मूल - नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी घाण साचली आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेने शहरातील कचरा साफ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.