लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सहभाग घ्या
By admin | Published: January 26, 2017 01:31 AM2017-01-26T01:31:39+5:302017-01-26T01:31:39+5:30
देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदान प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी आशुतोष सलील
आशुतोष सलील : जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस
चंद्रपूर : देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदान प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. नागरिकांनी आपण स्वत: व आपल्या आजूबाजूच्या लोकांना मतदानात भाग घेण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशुतोष सलील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अर्जून चिखले व उपविभागीय अधिकारी भानुदास गायकवाड उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्त्याने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्यामार्फतीने शहरातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध, चित्रकला, परिसंवाद स्पर्धा व दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोख बक्षित देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी १८ ते १९ वयोगटातील नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांना बिल्ले लाऊन छायाचित्र मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच तालुकास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेले चित्राचे प्रदर्शन या कार्यक्रमात लावण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अर्जून चिखले यांनी तर संचालन नायब तहसिलदार डॉ.कांचन जगताप यांनी केले. आभार तहसिलदार आशिष वानखेडे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)